कमालीची गती अन् चपळाईसह योग्य रणनीतीचं कसब दाखवून देत भारतीय महिला संघानं खो खो क्रीडा स्पर्धेतील पहिली वहिली वर्ल्ड स्पर्धा जिंकली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर रंगलेल्या फायनल लढतीत भारतीय संघानं नेपाळला शह देत वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलं. भारतीय महिला संघानं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला दबदबा कायम राखत अंतिम लढत ७८-४० अशा फरकाने जिंकत पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. कर्णधार प्रियांका इंगळेसह अन्य खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा गाजवलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघानं वर्ल्ड कप स्पर्धेत एकही सामना नाही गमावला
भारतीय महिला संघानं सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ६६-१६ असा धुव्वा उडवत फायनल गाठली होती. पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच आपला जलवा दाखवला. स्पर्धेतील एकही सामना न गमावता महिला ब्रिगेडनं पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरत नवा इतिहास रचला आहे.
पहिल्या हाफमध्ये आघाडी
अंतिम सामन्यात नेपाळच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बचाव करण्याला पसंती दिली. पहिल्या फेरीत भारतीय महिला खो खो संघआनं ३४ गुण मिळवत विजयाचा पाया रचला. दुसऱ्या फेरीत नेपाळनं आक्रमण करताना २४ गुण मिळवले. हाफ टाइममध्ये भारतीय महिला संघाने सामन्यात ३५-२४ अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या फेरीत भारतीय महिला खो खो संघाने ३८ गुण मिळवत सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली. तिसऱ्या फेरीनंतर स्कोअर लाइन ७३-२४ अशी होती. पण अखेरच्या टप्प्यात नेपाळच्या संघाने सर्वोत्तम खेळ दाखवत १६ गुण मिळवले. या फेरीत भारतीय महिला संघाने आपल्या खात्यात ५ गुण जमा करत फायनल लढत ७८-४० अशी आपल्या नावे करत इतिहास रचला.
भारतीय महिला खो खो संघाचा फायनलपर्यंतचा दिमाखदार प्रवास
खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत फक्त नेपाळचा संघच असा होता ज्या संघाविरुद्ध भारतीय संघाने ५० गुणांपेक्षा पेक्षा कमी अंतराने विजय नोंदवला. या स्पर्धेत एकूण १९ संघ सहभागी झाले होते. भारतीय महिला संघ इराण, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या संघांसह 'अ' गटात होता. साखळी फेरीतल दक्षिण कोरिया विरुद्ध भारतीय संघाने १७६-१८ असा मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर इराण विरुद्ध महिला ब्रिगेडनं १००-१६ आणि मलेशियाविरुद्ध १००-२० अशा फरकाने विजय नोंदवल्याचे पाहायला मिळाले. क्वार्टर फायनलमध्ये बांगालेदेळा १०९-१६ अशा फरकाने पराभूत केल्यावर सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ६६-१६ मात देत भारतीय महिला संघाने फायनल गाठली होती.