ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - अनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सध्या जोरदार काथ्याकूट सुरू आहे. आता बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक निवडीसाठी मुलाखत न घेताच मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी प्रशिक्षक निवडीनंतर सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात झालेल्या विवादानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बोर्ड हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या वृत्तानुसार प्रशिक्षकाच्या नियुक्तीच्या पद्धतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार क्रिकेट सल्लागार समितीला दिले आहेत. या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितल्यानुसार प्रशिक्षकपदासाठी मुलाखतीची पद्धत रद्द करण्यासाठी चर्चा झाली.
मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणारे उमेदवार निवडप्रक्रियेसाठी आपल्या प्रेझेंटेशनसह तयार आहेत. मात्र निवड प्रक्रिया कशी होईल, याबाबत इच्छुक उमेदवारांना अद्याप काहीही माहिती नाही. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै आहेत. दरम्यान, प्रशिक्षकाची निवड प्रक्रिया 10 जुलैला मुंबईत पूर्ण केली जाईल, असे सौरव गांगुली म्हणाला होता. अधिक वाचा : ( भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्री सर्वात पुढे )( मुख्य प्रशिक्षक म्हणून जयवर्धनेचा अनुभव कमी)
मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्यांना इच्छुक उमेदवारांच्या क्षमतेची माहिती आहे. त्यामुळे उमेदवारांनी पाठवलेल्या कागदपत्रांच्या छाननीनंतर मुलाखतीसाठी वेगळे बोलवण्याची गरज वाटत नाही, असे मंडळाचे मत आहे. आता क्रिकेट सल्लागार समितीची बैठक उद्या होणार आहे. त्यात मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीबाबत अंतिम निर्णय होणार आहे.