- रोहित नाईक -२०१३ विजेता : भारतइंग्लंड आणि वेल्समध्ये दुसऱ्यांदा आयोजित झालेल्या या स्पर्धेत टीम इंडियाने एकहाती वर्चस्व राखले. एकही सामना न गमावता विजेतेपदाला गवसणी घालतानाच, सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज आणि मालिकावीर अशा वैयक्तिक पुरस्कारांवरही भारतीयांनीच कब्जा केला. त्यातही दखल घेण्याची बाब म्हणजे या विजेतेपदासह तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आगळावेगळा विश्वविक्रमही नोंदवला जो अद्याप कायम आहे. आयसीसी विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही मानाच्या स्पर्धा जिंकणारा तो आतापर्यंतचा एकमेव कर्णधार ठरला.या स्पर्धेसह इंग्लंडनेही लक्षवेधी कामगिरी केली. दोन वेळा या स्पर्धेचे यजमानपद भूषविणारा पहिला संघ म्हणून इंग्लंडने मान मिळवला. यंदा तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यास इंग्लंड सज्ज आहे. या स्पर्धेमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि यजमान इंग्लंड यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी गेल्या दोन वेळचे विजेते आणि विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आॅस्टे्रलियाला मात्र साखळी फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. आॅस्टे्रलियाला सलामीला इंग्लंडविरुद्ध पराभूत व्हावे लागल्यानंतर, त्यांचा न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना पावसामुळे वाहून गेला. तिसऱ्या लढतीत आॅसीला मोठ्या विजयाची आवश्यकता असताना त्यांना श्रीलंकेविरुद्ध २० धावांनी पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे, फॉर्ममध्ये असलेल्या भारताने जबरदस्त घोडदौड करताना सहजपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला. मार्गात येणाऱ्या प्रत्येक संघाचा सहज धुव्वा उडवताना भारतीयांनी जेतेपदावर आपलाच हक्क असल्याचा इशारा दिला. त्यातही स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनला होता. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध कधीच पराभूत झाला नाही. त्याउलट, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इडिया पाकिस्तानविरुद्ध कधीही जिंकू शकली नव्हती. हा खराब रेकॉर्ड या वेळी धोनीच्या धुरंधरांना मिटवायचा होता आणि झालेही तसेच.पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताने पाकिस्तानला ८ विकेट्स आणि १७ चेंडू राखून नमवले. यासह टीम इंडियाने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला पराभूत करण्याची कामगिरी केली. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या भारतीयांनी पाकिस्तानला १६५ धावांत गुंडाळून अर्धी लढाई जिंकली. भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा यांनी भेदक मारा करून पाकिस्तानला झटपट गुंडाळले. यानंतर शिखर धवनची फटकेबाजी व इतर फलंदाजांच्या जोरावर भारताने २०व्या षटकात २ बाद १०२ धावा उभारल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पंचांनी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताला विजयी घोषित केले. याआधी भारताने दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांना नमवले होते. उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा फडशा पाडला, तर याआधी इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी २० षटकांचा खेळविण्यात आला. या वेळी टी२० स्पेशालिस्ट इंग्लंडला संभाव्य विजेते मानले जात होते. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताचा डाव १२९ धावांत रोखून विजयी मार्गावर कूच केली. परंतु, भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा निर्णायक मारा करताना सामन्याचे चित्र पालटले. जडेजा, आश्विन व इशांत शर्मा यांनी मोक्याच्या वेळी इंग्लंडला धक्के देत त्यांना २० षटकांत ८ बाद १२४ धावांवर रोखून भारताचे जेतेपद साकारले. स्पर्धेत कल्पक नेतृत्वाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांची हवा काढलेल्या महेंद्रसिंग धोनीने अंतिम सामन्यातही चाणाक्ष रणनीती आखत माफक धावसंख्येचे यशस्वी संरक्षण केले. यासह भारताने दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिकून आॅस्टे्रलियाची बरोबरी केली. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजाने ‘गोल्डन बॉल’ पटकावला, तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून ‘गोल्डन बॅट’ आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शिखर धवनने बाजी मारली. दरम्यान, या वेळी टीम इंडियाने चषक स्वीकारल्यानंतर केलेला जल्लोष आणि विराट कोहलीचा ‘गंगनम स्टाइल’ डान्स चांगलाच लक्षात राहिला.वैयक्तिक विजेतेसर्वोत्तम फलंदाज आणि मालिकावीर :शिखर धवन (भारत)(सामने : ५, धावा : ३६३, सरासरी : ९०.७५, सर्वोत्तम : ११४)सर्वोत्तम गोलंदाज :रवींद्र जडेजा (भारत)(सामने : ५, बळी : १२, सर्वोत्तम : ५/३६)
टीम इंडियाचा एकहाती दबदबा
By admin | Published: May 31, 2017 12:46 AM