ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद संभाळावे अशी बीसीसीआयची इच्छा असून, त्यासाठी राहुल द्रविडशी संपर्क साधण्यात आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. बीसीसीआयने नियुक्त केलेल्या मुख्य सल्लागार समितीने राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली आहे.
बीसीसीआयने नियुक्त केलेल्या सल्लागार समितीमध्ये भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण हे दिग्गज आहेत. राहुल द्रविड मागच्यावर्षभरापासून भारत 'अ' आणि अंडर-१९ संघाचे प्रशिक्षकपद संभाळत आहे.
कसोटी क्रिकेट आणि भारतातील युवा गुणवान क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी राहुल द्रविड या पदासाठी योग्य असल्याचे बीसीसीआयचे मत आहे. राहुल द्रविडकडून होकार आला तर, त्याला संघ बांधणीसाठी पूर्ण मोकळीक देण्यात येईल तसेच दूरदृष्टीचा विचार करुन त्याची २०१९ पर्यंत मुख्यप्रशिक्षकपदावर नियुक्ती केली जाऊ शकते.
भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांचा संघासोबतचा करार टी-२० वर्ल्डकपपर्यंतचा होता. त्यांना भारतीय संघासोबत काम करण्याची इच्छा आहे. पण त्यांच्या नावाचा मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचार होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य प्रशिक्षकपदावर चर्चा करण्यासाठी सल्लागार समितीची मंगळवारी बैठक होणार आहे.
द्रविडने सध्या आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हील्स संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी स्वीकारली आहे. मागच्या महिन्यात राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाखाली भारताच्या अंडर-१९ संघाने अंतिमफेरीपर्यंत मजल मारली होती.