मुंबई : भारताने २८ वर्षांनंतर २०११मध्ये विश्वचषकावर नाव कोरले होते आणि हे जेतेपद राखण्यासाठी संघाच्या अंतिम १५ योद्ध्यांची निवड मंगळवारी होणार आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. अष्टपैलूच्या शर्यतीत अक्षर पटेल याचा विचार होऊ शकतो. राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवड समितीने विश्वचषकासाठीच्या संभाव्य ३० जणांची निवड याआधीच केली असून, यातील अंतिम १५ खेळाडू मंगळवारी निवडण्यात येणार आहेत. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत विश्वचषकाची चुरस रंगणार आहे. विश्वचषकात खेळणारा संघ निवड समितीने आधीच ठरवला असेल. त्यात एकादा बदल झाल्यास आश्चर्य वाटायला नको. सध्यातरी सर्वांच्या नजरा रवींद्र जडेजा याच्या फिटनेसवर असेल. सलामीसाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जागा निश्चित समजली जात आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कामगिरीत सातत्य राखणाऱ्या मुरली विजय याचा तिसरा सलामीवीर म्हणून विचार होऊ शकतो. मधल्याफळीत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि अंबाती रायडूसह धोनी हे तगडे फलंदाज आहेत. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा याची निवड पक्की असून, तो विश्वचषकापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या भलत्याच फॉर्मात असलेला युवराज सिंग याचेही नशीब उजळू शकते. फिरकीची मदार आर. अश्विनवर आहे. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्याकडे जलद माऱ्याची धुरा असेल. भुवनेश्वरला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती; परंतु तिरंगी मालिका आणि विश्वचषकापूर्वी तो फिट होईल. (वृत्तसंस्था)
विश्वचषकासाठी संघनिवड आज
By admin | Published: January 06, 2015 1:35 AM