दोहा : अनुभवी नेमबाज तेजस्वनी सावंत हिने अखेर ऑलिम्पिकचा दरवाजा ठोठावलाच. २००८, २०१२ आणि २०१६ च्या ऑलिम्पिक संघात स्थान मिळविण्यापासून वंचित राहिलेल्या या कोल्हापूरच्या कन्येने शनिवारी स्वप्नपूर्ती करीत देशाला ऑलिम्पिकचा १२ वा कोटा मिळवून दिला. येथे सुरू असलेल्या १४ व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात मात्र ती पदाकापासून वंचित राहिली.माजी विश्वविजेत्या तेजस्विनीने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठून पुढील वर्षीच्या टोकियो आॅलिम्पिकची पात्रता मिळविली. आठ फायनलिस्टपैकी पाच नेमबाजांनी आधीच पात्रता गाठली असून, उपलब्ध असलेल्या तीनपैकी एका जागेवर भारतीय खेळाडूने नाव कोरले. ३९ वर्षांच्या तेजस्विनीने पात्रता फेरीत ११७१ गुणांसह पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरीत धडक दिली. अंतिम फेरीत मात्र ४३५.८ गुणांसह तिला चौथ्या स्थानावर समाधानी राहावे लागले.अंतिम फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात ती तिसºया स्थानी होती; पण ८.८ गुणांचा नेम साधताच ती पिछाडीवर पडली. पुढील वर्षी टोकियो आॅलिम्पिकसाठी संघात निवड झाल्यास तेजस्विनीचे हे पहिलेच आॅलिम्पिक असणार आहे. २०१० साली म्युनिच येथे ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात विश्वविक्रमाशी बरोबरी साधून तेजस्विनी जागतिक चॅम्पियन बनली. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी देशाची ती पहिली नेमबाज ठरली होती.>सातत्याने प्रयत्न करणाºया तेजूला यंदा टोकियोमध्ये अचूक सुवर्ण वेध घेता येईल. त्यादृष्टीने ती कसून सराव करीत आहे. तिचे आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न आहे. तिची वाटचालही त्याकडेच सुरू आहे.- सुनीता सावंत, तेजस्विनीची आई
तेजस्विनीने मिळवून दिला भारताला ऑलिम्पिक कोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 3:18 AM