नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक विजेती संजीता चानू हिच्यावर डोपिंगमध्ये अपयशी ठरल्याने लावलेले तात्पुरते निलंबन मागे घेतले आहे. वर्षभर चाललेल्या तपासात संजीताच्या नमुन्याच्या क्रमांकात हेराफेरी झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणी अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा आंतरराष्टÑीय महासंघाने केली.आयडब्ल्यूएफच्या वकील इवा निरफा यांनी संजीता आणि भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनला ई-मेल पाठविला. त्यात संजीतावर लावलेली अस्थायी बंदी २२ जानेवारी २०१९ पासून रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आयडब्ल्यूएफचे पॅनल लवकरच अंतिम निर्णय घेईल.गोल्डकोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत संजीताने ५३ किलो गटाचे सुवर्ण जिंकले होते. तिला स्टेराईड टेस्टोस्टेरोन सेवनात दोषी धरण्यात आले. त्यानंतर १५ मे रोजी अस्थायी बंदीची घोषणा करण्यात आली होती. आयडब्ल्यूएफने मागच्या वर्षी जुलैमध्ये स्वत:ची चूक कबूल केली होती. आपल्या अहवालात संजीताच्या नमुन्याचा चुकीचा क्रमांक दिल्याचे त्यांचे मत होते. संजीताला डोपिंगमध्ये पॉझिटिव्ह असल्याचे सांगणाऱ्या ई-मेलमध्ये नमुन्याचे दोन वेगवेगळे क्रमांक पाठविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)>मी निष्पाप, आधीही डोपिंग केले नाही...‘‘ मला आंतरराष्टÑीय फेडरेशनचा मेल मिळाला. राष्टÑीय महासंघानेदेखील फोनवर माहिती दिली. मला दिलासा मिळाला आहे. मी निष्पाप आहे. करिअरमध्ये कधीही मी डोपिंग केले नाही. आंतरराष्टÑीय महासंघाच्या चुकीच्या पद्धतीमुळे मी नऊ महिन्यांपासून मानसिकदृष्ट्या दडपणात आहे. खेळाडूची प्रतिष्ठा फार मोलाची असते. माझ्यासोबत जे घडले ते कधी कुणाच्या वाट्याला येऊ नये. भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने आता राष्टÑीय शिबिरात सहभागी होण्यास सांगितले आहे. मी सहभागी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्व चॅम्पियनशिपला मी मुकले. यंदा मात्र विश्व चॅम्पियनशिपद्वारे आॅलिम्पिक २०२० साठी पात्रता मिळवू इच्छिते.’’ - संजीता चानू, वेटलिफ्टर.
वेटलिफ्टर संजीता चानूवरील तात्पुरते निलंबन हटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:09 AM