जिनेव्हा : टेनिस विश्वाचा सम्राट म्हणून नावाजला जाणारा स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याची शानदार कारकीर्द अंतिम टप्प्यात आली आहे. स्विस मीडियाद्वारे बुधावारी प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत स्वत: फेडररने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. फेडरर सध्या ४० वर्षांचा असून, भविष्यात आता मुख्य स्पर्धांमध्ये त्याचे खेळणे कठीण दिसत असल्याने त्याची कारकीर्द अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा टेनिसविश्वात सुरू आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून फेडरर गुडघा दुखापतीने त्रस्त आहे. ‘गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेपर्यंत स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याची आशा नाही,’ असे फेडररने सांगितले. फेडररने पुढे म्हटले की, ‘विम्बल्डनमध्ये मी खेळलो, तर ते अनपेक्षित ठरेल आणि हे सत्य आहे; पण मी जूनपर्यंत खेळू शकणार नाही, यात आश्चर्याचे कोणतेही कारण नाही. शस्त्रक्रिया होण्याआधीपासूनच आम्हाला कल्पना होती की, अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी आम्हाला मोठ्या कालावधीच्या ब्रेकची गरज लागेल.’
तिसरी शस्त्रक्रियाn यंदा जुलै महिन्यात फेडररला विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत सरळ ३ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्याने एकही स्पर्धा खेळलेली नाही. n काही आठवड्यांपूर्वी त्याने शस्त्रक्रिया करून घेतली होती. n दखल घेण्याची बाब म्हणजे, गेल्या १८ महिन्यांत गुडघ्यावर झालेली ही तिसरी शस्त्रक्रिया ठरली. n सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांमध्ये फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविचसह संयुक्तपणे अव्वल स्थानी असून, यांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम पटकावली आहेत.