मुंबई : टेनिस प्रीमिअर लीगच्या सहाव्या हंगामासाठी बुधवारी मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी आठ फ्रँचायझींनी खेळाडूंवर बोली लावली. आर्मेनियाची एलिना एव्हानेस्यान ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती एका व्यासपीठावर दिसले. दिग्गज टेनिसपटूंसह अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि सोनाली बेंद्रे यांचीही उपस्थिती होती. चार फेऱ्यांच्या चुरशीच्या लिलावानंतर सर्व संघांनी जगभरातील गुणवान खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेऊन संघ निवडला. बंगळुरू एसजी पायपर्स, बंगाल विझार्ड्स, पंजाब पेट्रियॉट्स, हैदराबाद स्ट्रायकर्स, गुजरात पँथर्स, यश मुंबई ईगल्स, चेन्नई स्मॅशर्स आणि श्राची दिल्ली आरएआरएच टायगर्स हे आठ संघ मैदानात असतील. खरे तर प्रथमच टेनिस प्रीमिअर लीगमध्ये खेळत असलेल्या २२ वर्षीय एलिना एव्हानेस्यान हिने सर्वाधिक भाव खाल्ला. तिला ४२.२० लाख रुपयांच्या किंमतीत प्रियेश जैन यांच्या मालकीच्या व तापसी पन्नूचा पाठिंबा असलेल्या पंजाब पेट्रियॉट्स संघाने खरेदी केले. अन्य फ्रँचायझींनी देखील एलिनाला आपल्या संघात घेण्यासाठी संघर्ष केला. तसेच पेट्रियॉट्स संघाने पुरूष गटातील प्लॅटिनम श्रेणीतील अर्जुन कढेची ५ लाख या मूळ किंमतीत खरेदी केली. याशिवाय मुकूंद ससिकुमारची ६.८० लाख रुपयांत खरेदी झाली.
३ डिसेंबरपासून स्पर्धेला सुरुवातगतविजेत्या बंगळुरू एसजी पायपर्सच्या संघाने दोन वेळचा ग्रॅण्ड स्लॅम मिश्र दुहेरी विजेता ऑस्ट्रेलियाचा मॅक्स पर्सेल याला आपल्या संघाचा भाग बनवले. त्याला ४२ लाख रूपये मिळाले. रोहन गुप्ता यांच्या मालकीच्या व एसजी स्पोर्टसचा मुख्य अधिकारी महेश भूपती यांचा पाठिंबा असलेल्या बंगळुरू संघाने लिलावात उशिरा भाग घेतला. पण, तरी देखील त्यांनी ऑलिम्पिकपटू अंकिता रैनाला ५ लाख देऊन आपल्या ताफ्यात घेऊन संघाची ताकद वाढवली. याशिवाय त्यांनी अनिरुद्ध चंद्रशेखरला ४ लाख रुपयांत आपल्याकडे खेचले.
टेनिस आयकॉन म्हणून ओळख असलेल्या सानिया मिर्झाचा गतवर्षीच्या उपविजेत्या बंगाल विझार्ड्स संघाला पाठिंबा आहे. त्यांनी क्रोएशियाच्या पेट्रा मॅट्रिकला ३५ लाख रुपयांत खरेदी करताना बरीच बचत केली. तसेच बंगालने श्रीराम बालाजी (६.२० लाख) आणि निकी पोनाच्चा (३.८० लाख) यांना आपल्या संघात घेतले. टेनिस प्रीमिअर लीगचा सहावा हंगाम ३ ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस संकुलात पार पडेल.
कोण कोणत्या संघात
- बंगळुरू एसजी पायपर्स - अंकिता रैना, मॅक्स पुरसेल, अनिरुद्ध चंद्रशेखर
- बंगाल विझार्ड्स - पेट्रा मॅरीक, श्रीराम बालाजी, निक्की पोनाच्चा
- पंजाब पेट्रियॉट्स - एलिना एव्हानेस्यान, अर्जुन काढे, मुकुंद ससिकुमार
- हैदराबाद स्ट्रायकर्स - हॅरिट डार्ट, बेन्जमिन लॉक, विश्नू वर्धन
- गुजरात पँथर्स - सहाजा यमलापल्ली, सुमित नागल, विजय सुंदर
- यश मुंबई ईगल्स - जॅकलीन ख्रिस्तियन, करण सिंग
- चेन्नई स्मॅशर्स - कोनी पेर्रीन
- श्राची दिल्ली आरएआरएच टायगर्स - इर्याना शायमानोविच