जागतिक टेनिसमधील अग्रगण्य नाव आणि अनेकदा विम्बल्डन व २० वेळा ग्रॅडस्लॅम जगजेत्ता राहिलेल्या रॉजर फेडररची भेट घेणं निश्चितच अनेकांसाठी स्वप्नवत गोष्ट आहे. तसेच, भारतीय ऑलिंपिकवीर नीरज चोप्राही जगातील कोट्यवधी तरुणांसाठी रोल मॉडेल आहे. मात्र, जगजेत्ता असलेल्या या दोन्ही खेळाडूंची भेट झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या कामगिरीचं कौतुक करत आनंद व्यक्त केला. नुकतेच भारताचा नीरज चोप्रा आणि स्विस टेनिसस्टार रॉजर फेडरर यांची स्वित्झर्लंडमध्ये भेट झाली.
स्वित्झर्लंड टुरिझमद्वारे आयोजित एका कार्यक्रमात रॉजर फेडरर आणि नीरज चोप्रा यांची भेट झाली. दोघांनी निश्चितच यावेळी खेळावर चर्चा केली. तसेच, एकमेकांच्या खेळातील योगदानाबद्दलही दोघांनी स्तुती केली. नीरजने आपल्या दृढनिश्चिय आणि जिद्दीतून व्यक्तिगत पातळीवर देशासाठी मोठं यश मिळवलं आहे, असे फेडररने यावेळी म्हटले. फेडरर हे 'स्वित्झर्लंड टुरिझम'चे सदिच्छा दूत आहेत. तर नीरज चोप्रा हेही स्वित्झर्लंड टुरिझमचे मैत्री दूत आहेत. त्यामुळे, दोघांमध्ये स्वित्झर्लंडच्या पर्यनटनाचा खास बॉण्ड आहे.
रॉजर फेडररला भेटून माझं स्वप्न पूर्ण झालंय, अशा शब्दात नीरज चोप्राने या भेटीचं वर्णन केलंय. रॉजर यांचं कौशल्य, खेळाप्रतीची भावना आणि लाखो युवकांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या व्यक्तीमत्वाचं मी नेहमीच कौतुक केलंय. मात्र, आज त्यांच्यातील विनम्रतेने मी अधिक भारावलो आहे. त्यामुळे, त्यांच्यासारख्या व्यक्तीमत्त्वासोबत उभे असतानाही मी सहज आहे. दोघांनीही मैदानातील आणि मैदानाबाहेर आपल्या खेळाचे आणि इतरही अनुभव एकमेकांसोबत शेअर केले.
दरम्यान, यावेळी नीरज चोप्राने स्वत:ची सही असलेली आशियाई खेळांची जर्सी रॉजर फेडररला गिफ्ट केली. तर, फेडररनेही नीरजला टेनिस रॅकेट गिफ्ट केलं आहे. दोन्ही दिग्गज खेळाडूंची ही सर्वसाधारण भेट दोघांच्याही चाहत्यांना भावली.