ऑनलाइन टीम
लंडन, दि. २० - इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत भारताचा दुसरा डाव ३४५ धावांवर संपुष्टात आला. रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार या जोडीने आठव्या विकेटसाठी ९९ धावांची महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याने भारताला ३४५ ची मजल गाठता आली. इंग्लंडला विजयासाठी ३१९ धावांचे लक्ष्य असून आता भारताची सर्व मदार गोलंदाजांवर आहे.
लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने चार बाद १६९ धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. मुरली विजय आणि कर्णधार धोनी ही जोडी मैदानावर होती. भारतीय संघाने दोनशेचा उंबरठा ओलांडताच कर्णधार धोनी अवघ्या १६ धावांवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर स्टुअर्ट बिन्नी भोपळा न फोडताच बाद झाला. सहाव्या क्रमांकावर आलेला बिन्नी संयमी फलंदाजी करण्याच्याऐवजी फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला. भारताची अवस्था सहा बाद २०३ अशी झाली. यानंतर २३५ धावांवर मुरली विजय ९५ धावांवर बाद झाला. त्याचे शतक अवघ्या ५ धावांनी हुकले. यानंतर रविंद्र जडेजा (६८ धावा) आणि भुवनेश्वर कुमार (५२ धावा) या दोघांनी आठव्या विकेटसाठी ९९ धावांची मोलाची भागीदारी करुन भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. भारताच्या ३३४ धावा झाल्या असताना जडेजा बाद झाला. यानंतर शमी आणि भुवनेश्वर कुमारही बाद झाल्याने भारताचा डाव ३४५ धावांवर संपुष्टात आला.इंग्लंडतर्फे बेन स्टोक्स आणि लियॉम प्लंकेटने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मोईन अलीने दोन तर जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी एक विकेट घेतली.
इंग्लंडला विजयासाठी ३१९ धावांचे लक्ष्य असून अजून चौथ्या दिवसाचे एक सत्र व पाचवा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे भारताची सर्व मदार गोलंदाजांवर आहे. फलंदाजीत चमकदार कामगिरी करणा-या रविंद्र जडेजाने इंग्लंडला पहिला धक्काही दिला. दुस-या डावाची सुरुवात झाल्यावर इंग्लंडचा सलामीवर सॅम रॉबसन अवघ्या सात धावांवर पायचीत झाला,