नवी दिल्ली : भाग्यवती काचरी (७५ किलो) हीने मंगळवारी थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरीत जागा मिळवली. यासह भारताचे एक पदक निश्चीत झाले. यंदा इंडिया ओपनमध्ये सुवर्ण मिळवणाऱ्या भाग्यवतीने व्हिएतनामच्या नगुएन हुआंगला ५-० ने नमवून कूच केली.
पुरूषांमध्ये आशीष कुमारने (६९) गटात क्रोएशियाच्या पीटर सेटनिचला ५ -० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक विजेत्या मोहम्मद हुसामुद्दीननेही (५६) अंतिम आठमध्ये प्रवेश करत बोट्सवानाच्या जॉर्ज मोलवांतावाला ५-० असे पराभूत केले.
सोमवारी आशियाई चॅम्पियनशीपचा रौप्य पदक विजेता दीपक सिंग (४९ किलो) आणि माजी विश्व ज्युनियर चॅम्पियन निखत जरीन (५१ किलो) उपांत्यपूर्व फेरीत पोहचणाºया सात भारतीयांमध्ये होते. त्यासोबतच इंडिया ओपनचा माजी सुवर्ण पदक विजेता मनिष मोन (५७ किलो), आशियाई चॅम्पियनशीपचा रौप्य पदक विजेता आशीष कुमार (७५ किलो), स्ट्रँडझा कपची रौप्य पदक विजेती मंजू रानी (४८ किलो) आणि इंडिया ओपनचा रौप्य पदक विजेता ब्रिजेश यादव (८१ किलो) यांनीही अंतिम आठमध्ये जागा मिळवली आहे.