ठाणे शहर पोलीसांची विजयी सलामी महापौर चषक कबड्डी : महिलांमध्ये होतकरुची चमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2016 12:28 AM
मुंबई : ठाणे शहर पोलिस आणि मुंबई बंदर यांनी आपआपल्या सामन्यात शानदार बाजी मारताना ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात विजयी सलामी दिली. त्याचवेळी महिलांमध्ये होतकरु(ठाणे) आणि डॉ. शिरोडकर या संघांनी विजयी सलामी दिली.
मुंबई : ठाणे शहर पोलिस आणि मुंबई बंदर यांनी आपआपल्या सामन्यात शानदार बाजी मारताना ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात विजयी सलामी दिली. त्याचवेळी महिलांमध्ये होतकरु(ठाणे) आणि डॉ. शिरोडकर या संघांनी विजयी सलामी दिली.ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरु असलेल्या या स्पर्धेच्या पुरुष गटात ठाणे शहर पोलीसांनी अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात महाडिक उद्योग कोल्हापूर संघाचे आव्हान १९-१३ असे परतावले. हरिष टावरे आणि प्रदीप टक्के यांच्या दमदार चढाई व पकडींच्या जोरावर ठाणे पोलीसांनी बाजी मारली. पराभूत संघाकडून संग्रामचा खेळ चांगला झाला. अन्य सामन्यात मुंबई बंदरने आक्रमक खेळ करताना एकतर्फी सामन्यात सेंट्रल बँक संघाचा ३२-१७ असा धुव्वा उडवला. दादा आव्हाड व मोबीन शेख यांच्या धडाक्यापुढे बँकेचा काहीच निभाव लागला नाही.महिलांमध्ये होतकरु संघाने आपल्या लौकिकानुसार विजय मिळवताना पोयसर जिमखानाचे आव्हान ५३-३५ असे परतावले. अद्वैत मांगले आणि सायली परुळेकर यांचा खेळ होतकरुच्या विजयात निर्णायक ठरला. तर पोयसरकडून पल्लवी पोटे व मोनिका मारिया यांनी कडवी झुंज दिली. अन्य सामन्यात बालढ्य डॉ. शिरोडकर संघाने शिवतेज ठाणे संघाचा फडशा पाडताना ४८-१६ असा दणदणीत विजय मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी).......................................फोटो : महिलांच्या सामन्यातील थरारक क्षण