पॅरिस ऑलिम्पिकसाठी मी कोणतीही कसर ठेवली नव्हती. मी पूर्ण तयारीनेच खेळलो होतो; पण तो दिवस अर्शद नदीमचा होता. त्याने त्यादिवशी सर्वांना मागे टाकले,' असे सांगत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले. ८ ऑगस्टला रात्री झालेल्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरची फेक करत सुवर्ण जिंकले होते. नीरजने (८९.४५) रौप्य पदकावर समाधान मानले होते. नीरजने एका मुलाखतीत म्हटले की, 'त्यादिवशी काहीच चुकीचे झाले नव्हते. सर्वकाही बरोबर सुरू होते. थ्रोदेखील चांगले होत होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणेही काही छोटी गोष्ट नाही; पण माझ्या मते स्पर्धा खूप चांगली रंगली आणि सुवर्णपदक त्यानेच जिंकले, ज्याचा दिवस चांगला होता. तो नदीमचा दिवस होता.'
नीरजने भारत-पाकिस्तान यांच्यात नव्या खेळामधील टक्कर निर्माण झाल्याचेही मत व्यक्त केले. तो म्हणाला की, 'भालाफेकमध्ये कोणतेही दोन संघ नसतात. वेगवेगळ्या देशाचे १२ खेळाडू एकमेकांविरुद्ध लढतात. मी २०१६ पासून नदीमविरुद्ध भालाफेकमध्ये सहभागी झालोय आणि पहिल्यांदाच नदीमने विजय मिळवला आहे.' नदीमविषयी नीरज म्हणाला की, 'नदीम खूप चांगली व्यक्ती आहे. तो खूप चांगल्याप्रकारे बोलतो. सन्मान करतो. त्यामुळेच मला तो चांगला वाटतो.'