नवी दिल्ली : युवा भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला अलीकडेच नेदरलँड्सच्या विझ्क ऑन झी येथे झालेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत लैंगिक भेदभावाचा सामना करावा लागला. प्रेक्षकांना माझा पेहराव, केस आणि हावभाव यातच अधिक रुची असल्याचे जाणवल्याचा गंभीर आरोप नागपूरच्या या १८ वर्षांच्या प्रतिभावान खेळाडूने केला. आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने इन्स्टाग्राम पोस्ट करीत मनातील खदखद व्यक्त केली.
दिव्या म्हणाली, ‘मी अनेक दिवसांपासून यावर भाष्य करण्याचे ठरविले होते. स्पर्धा संपायची प्रतीक्षा होती. प्रेक्षक महिला बुद्धिबळपटूंकडे वेगळ्या नजरेने बघतात, हे माझ्या ध्यानात आले. मी स्वत: हा अनुभव घेतला. काही सामन्यांत मी फार दमदार कामगिरी केली, मला कामगिरीवर गर्व आहे. खरे तर प्रेक्षकांचे लक्ष माझ्या खेळावर नव्हतेच. त्यांना माझा पेहराव, केस आणि हावभाव यात जास्त रुची असल्याचे जाणवले.’ दिव्या ही चॅलेंजर श्रेणीत ४.५ गुणांसह १२ व्या स्थानावर राहिली.
दिव्याने म्हटले की, ‘पुरुष खेळाडूंच्या खेळावर प्रेक्षक लक्ष केंद्रित करीत होते. त्याचवेळी महिला खेळतात तेव्हा बहुतांश प्रेक्षक मी कशी दिसते, माझे कपडे कुठले आहेत, कशी वावरते, याकडे लक्ष होते. मी कशी खेळते आहे याच्याशी प्रेक्षकांना काही घेणेदेणे नव्हते. मुलाखत देत असतानादेखील माझ्या लक्षात आले की माझा खेळ कसा आहे याकडे न पाहता माझ्या शरीराकडे, माझ्या कपड्यांकडे, केसांकडे पाहत होते. मी कसा खेळ केला आणि मला काय अडचणी आल्या हे जाणून घेणाऱ्यांची संख्या नगण्य होती.’
महिलांना सन्मान मिळावा...दिव्या म्हणाली, ‘मी जेमतेम १८ वर्षांची आहे. महिलांची प्रगती मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, महिला खेळाडूंना दुर्व्यवहार सहन करावा लागतो. त्यांच्या खेळापेक्षा कपडे, फॅशन आणि इतर गोष्टींवर चर्चा केली जाते. महिला खेळाडूंचे हवे तसे कौतुक होत नाही. त्यांच्याबद्दल वाईटच अधिक बोलले जाते. बुद्धिबळाची सुरुवात केल्यापासून मी वाईट नजरांचा आणि तिरस्काराचा सामना बऱ्याचदा केला. महिला खेळाडूंना समान आणि योग्य सन्मान मिळाला पाहिजे.’