FIFA World Cup 2022 Final Tickets: कतारमध्ये रविवारपासून फिफा विश्वचषकाला सुरुवात होत आहे. सर्व अडथळे पार करून कतार मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचे आयोजन करत आहे. हा विश्वचषक भव्यदिव्य करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम विश्वचषकाच्या तिकिटांच्या किमतीवरही दिसून येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतार वर्ल्ड कपची तिकिटे ही आतापर्यंतची सर्वात महागडी तिकिटे आहेत. २०१८च्या तुलनेत यावेळी तिकीट दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत. असे असतानाही जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
तिकीटाची किंमत हजारांच्या घरात
रशियात झालेल्या गेल्या विश्वचषकात एका चाहत्याला सामन्याच्या तिकिटासाठी सरासरी २१४ पौंड म्हणजेच २० हजार रुपये मोजावे लागले होते, तर कतारमध्ये तिकिटाची सरासरी किंमत २८६ पौंड म्हणजेच सुमारे २८ हजार रुपये आहे. या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचे सर्वात महागडे तिकीट ६८६ पौंड म्हणजेच ६६,७९० रुपये आहे. गेल्या पाच विश्वचषकातील हे सर्वात महागडे तिकीट आहे.
कतारला जाण्याचा खर्च तिकीटापेक्षाही कमी
गेल्या वर्षीच्या तुलनेत हे तिकीट ५९ टक्के अधिक आहे. म्युनिकच्या स्पोर्ट्स आउटफिटरच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. दिल्ली ते कतार फ्लाइट तिकिटाची सरासरी किंमत ५० हजार रुपये आहे. याचा अर्थ अंतिम तिकीट कतार फ्लाइट तिकिटापेक्षाही जास्त महाग असणार आहे.