नवी दिल्ली ।
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनंमेंट (WWE)चा कधीकाळी चॅम्पियन असलेला 'द ग्रेट खली' अर्थात दलीप सिंग राणा यावेळी भररस्त्यात टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसला आहे. विशेष म्हणजे ही कोणतीही फाइट नसून ही सत्य घटना आहे. खलीने टोलवरील कर्मचाऱ्यांशी घातलेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, या व्हिडीओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की खलीकडून आयडी कार्ड मागितले म्हणून त्याने टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारली. तर कर्मचारी खलीला ब्लॅकमेल करत असल्याचे खली व्हिडीओमध्ये म्हणत आहे. एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी कारमध्ये घुसत होता त्यामुळे हा सर्व प्रकार घडला.
जालंधरहून कर्नालला जाताना घडली घटनाद ग्रेट खली जालंधरहून कर्नालला जात असताना हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे हा व्हिडीओ फिल्लोर टोल प्लाझा जवळील असल्याचा बोललं जात आहे. खलीने सांगितलं की एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी कारमध्ये घुसत होता. तेव्हा त्याला नकार दिल्याने वाद चिघळला आणि स्थानिक पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. यानंतर आणखी काही कर्मचारी आले आणि त्यांनी कारला घेरून खलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.
भररस्त्यात WWE चा थरारकर्मचाऱ्यांची संख्या पाहता खली कारमधून बाहेर आला आणि बॅरियर हटवून कार नेण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान कर्मचाऱ्याने खलीला बॅरियर हटवण्यापासून देखील रोखले, तेव्हा स्टार रेसलरने त्याला बाजूला ढकलले. लक्षणीय बाब म्हणजे खली आता एक राजकारणी देखील असून तो भारतीय जनता पार्टीचा (BJP) नेता आहे. मात्र त्याने अद्याप कोणतीही निवडणूक लढली नाही.
दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी फक्त खलीकडे आयडी कार्डची विचारपूस केली होती. एवढ्या शुल्लक कारणावरून खलीने थप्पड मारल्याचा कर्मचारी आरोप करत आहेत. व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे की एक कर्मचारी खलीला ढिवचताना दिसत आहे. रागात असलेले कर्मचारी खलीला तिथून जाऊन देत नव्हते तेवढ्यात पोलिसांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला.