Lovlina Borgohain, CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भारतीय क्रीडा क्षेत्राला ढवळून टाकणारी घटना समोर येत आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी विक्रमी कांस्यपदक जिंकणारी बॉक्सर लव्हलीना बोरगोहाईं हिने तिचा मानसिक छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. सोशल मीडियावर तिने पोस्ट लिहून तिच्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. ''मला हे सांगताना खूप दुःख होतंय की, माझी खूपच पिळवणूक होत आहे,''या संवादाने तिने आपल्यावरील अत्याचार सांगण्याची सुरूवात केली.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत लव्हलीनाला उपांत्य फेरीत जागतिक विजेत्या बुसेनाज सुर्मनेलीकडून हार मानावी लागली होती. पण, तिने कांस्यपदक निश्चित केले. विजेंदर सिंग ( २००८) आणि मेरी कोम ( २०१२) यांच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय बॉक्सर ठरली होती.
''संध्या गुरुजींना राष्ट्रकुल क्रीडा गावाच्या बाहेर उभे केले गेले आहे आणि ८ दिवसांपासून माझा सराव बंद आहे. माझ्या दुसऱ्या प्रशिक्षकांना भारतात परत पाठवण्यात आले आहे. विनंती करूनही प्रशिक्षकांना अशी वागणून मिळत असल्याने माझा मानसिक छळ होतोय. आता मी खेळाकडे लक्ष केंद्रीत करू की या सर्व गोष्टीकडे हेच कळत नाही. याच कारणामुळे मागील जागतिक स्पर्धेत माझी कामगिरी निराशाजनक झाली होती. याच राजकारणामुळे मला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक गमवायचे नाही. या राजकारणावर मात करून देशासाठी पदक जिंकण्यात यशस्वी होईन, अशी आशा आहे. जय हिंद!,''असेही तिने लिहिले.