सिडनी : आॅस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मैदान आणि मैदानाबाहेरील परिस्थिती गंभीर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून सुरुवातीलाच बाहेर होणाऱ्या या देशातील २०० क्रिकेटपटूंवर बेरोजगारीचे संकट घोंघावत आहे. १ जुलैपासून सिनियर खेळाडू बेरोजगार होऊ शकतात, असे आॅस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष ग्रेग डायर यांचे मत आहे.क्रिकेट आॅस्ट्रेलिया आणि देशातील आघाडीच्या खेळाडूंमधील सध्याच्या कराराची मुदत आज ३० जून रोजी संपणार आहे. आतापर्यंत नव्या करारावर स्वाक्षरी झालेली नाही. यावर डायर यांचे मत असे की, करारातील आवश्यक बाबींची पूर्तता झालेली नाही. खेळाडूंसाठी जे करता येईल, ते करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत.सीएने आज सर्वच खेळाडूंना औपचारिक पत्र पाठवून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादावर निर्णय न झाल्यास आपण बेरोजगार होऊ शकाल, असा इशारा दिला आहे. यादरम्यान आॅस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू याच आठवड्यात आपल्या लोकप्रियतेचा अधिकार परदेशात विकता येऊ शकतो काय, याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे सीएचे हाय परफॉर्मन्स मॅनेजर पॅट हॉवर्ड यांनी सर्व खेळाडूंना अन्य देशातील टी-२० लीग खेळण्यासाठी बोर्डाची परवानगी घ्यावी लागेल, असे कळविले आहे.कराराच्या वाटाघाटी होत नसल्याने आॅस्ट्रेलियाचा आगामी आॅगस्टमधील दोन कसोटी सामन्यांचा दौरा आणि त्यानंतर नोव्हेंबरमधील अॅशेस मालिकेच्या आयोजनावर देखील प्रश्नचिन्ह लागले आहे. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, १ जुलै रोजी करारावर तोडगा न निघाल्यास आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंना विदेशातील लीगवर विसंबून राहावे लागेल. सीएने मात्र खेळाडूंना इशारा देत प्रतिस्पर्धी प्रायोजकांसोबत करार केल्यास करार मिळणार नसल्याचे म्हटले आहे. खेळाडू आणि सीए यांच्यात सुरू असलेल्या ताठर भूमिकेवरून एक बाब मात्र स्पष्ट आहे ती म्हणजे खेळाडू आर्थिक लाभ वाटण्याच्या नव्या प्रस्तावाला पाठिंबा देणार नसतील तर सीएदेखील त्यांच्यापुढे शरण येण्यास तयार नाही. (वृत्तसंस्था)
...तर आॅस्ट्रेलियाचे २०० क्रिकेटपटू होतील बेरोजगार
By admin | Published: June 30, 2017 12:53 AM