राजकोट : भारत - इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी समालोचन करताना सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग या दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी अनोखी इच्छा व्यक्त करून सर्वांचे लक्ष वेधले. दोन्ही माजी खेळाडूंनी, पुढील जन्म मिळाल्यास एकमेकांचे विक्रम मोडीत काढण्याची इच्छा व्यक्त केली. या सामन्यात चेतेश्वर पुजारा ज्यावेळी शतकाच्या उंबरठ्यावर होता त्यावेळी गावसकर आणि सेहवाग यांनी अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी पुजारा शतक पूर्ण करण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक खेळत होता. त्यावरून या दोघांची जुगलबंदी रंगली. (वृत्तसंस्था)वीरुने देखील आपली इच्छा व्यक्त करताना सांगितले की, ‘सनी भाई, माझी पण इच्छा होती की, तुमचा ३४ कसोटी शतकांचा विक्रम मोडावा. मात्र, मी असे करु शकलो नाही. जर मला दुसरा जन्म मिळाला, तर मी नक्कीच तुमचा ३४ कसोटी शतकांचा विक्रम मोडेन.’‘वीरु एकमेव असा फलंदाज आहे, जो आपले द्विशतक आणि त्रिशतक षटकार मारुन पूर्ण करीत असे. मी खेळत असताना माझीही इच्छा होती की, किमान एक तरी शतक षट्कार मारुन पूर्ण करावे. मला चांगले आठवतंय की, मेलबोर्न कसोटीमध्ये मी शतकाच्या खूप जवळ होतो आणि मोठा फटका मारुन मी शतक झळकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू सीमारेषेच्या आधीच दीड फुटावर पडला आणि तो फटका चौकार झाला. जर मला दुसरा जन्म मिळाला, तर मी नक्कीच वीरुप्रमाणे षट्कार मारुन शतक पूर्ण करेन.’पहिल्या रणजी सामन्यात २२ नो बॉलदरम्यान, यावेळी भारताचे महान अष्टपैलू कपिल देव यांनीही समालोचन करताना आपल्या पहिल्या रणजी सामन्याच्या आठवणींना उजाळा दिल्या. नोव्हेंबर १९७५ साली पंजाबविरुद्ध हरयाणाकडून खेळताना कपिल यांनी तब्बल २२ नो बॉल टाकल्याची आठवण सांगितली. मात्र, याच सामन्यात त्यांनी हरयाणासाठी निर्णायक कामगिरी करताना पहिल्या डावात ३९ धावांच्या मोबदल्यात ६ आणि दुसऱ्या डावात ७८ धावांत २ बळी घेत संघाला विजयी केले होते. त्यावेळी कपिल १६ वर्षांचे होते.
... तर एकमेकांचा विक्रम मोडू
By admin | Published: November 12, 2016 1:41 AM