भोसरी : भारतात सध्या अतिशय चांगले दिवस आलेल्या कबड्डीची लोकप्रियता वाढत आहे. मात्र, आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेत कबड्डीचा समावेश नाही. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या कबड्डीचा आॅलिम्पिकमध्ये समावेश केल्यास भारताला सुवर्णपदक मिळेल, असा विश्वास अर्जुन पुरस्कारविजेते व यू मुंबा संघाचा खेळाडू राकेशकुमार यांनी व्यक्त केला. राकेशकुमार भैरवनाथ कबड्डी संघ आयोजित दहीहंडी उत्सवासाठी भोसरीत आले होते. तेव्हा ते ‘लोकमत’शी बोलत होते. कबड्डीला राजमान्यता प्राप्त होत आहे. प्रो कबड्डीमुळे खेळाची लोकप्रियता वाढू लागली आहे. मात्र, इतर खेळांचा समावेश होत असताना आॅलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश होत नाही. त्यामुळे दु:ख वाटते. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी कुस्ती व बॅडमिंटनमध्ये पदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर आणखी पदके मिळू शकतील. कबड्डीचा समावेश केल्यास प्रत्येक आॅलिम्पिकमध्ये कबड्डी संघ पदक मिळवू शकेल. केंद्र सरकार खेळाडूंसाठी चांगल्या सोयी-सवलती देऊ लागले आहे. खेळाडू व स्पर्धांसाठी चांगले दिवस सुरू झाले आहेत. कबड्डीला क्रिकेटपेक्षा जास्त लोकप्रियता मिळू शकेल. सर्वांनी कबड्डीचा आॅलिम्पिकमध्ये समावेश होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे राकेशकुमार म्हणाले.त्यांच्या समवेत पै. योगेश लांडगे, नितीन लांडगे व भैरवनाथ कबड्डी संघाचे खेळाडू उपस्थित होते. राकेशकुमार मूळचे दक्षिण दिल्लीमधील खेळाडू. १९९७पासून शालेय कबड्डी खेळायला सुरुवात केली. २००३पासून भारतीय संघात खेळत असताना २००४ व २००७मध्ये वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्यांनी मोठी कामगिरी होती. एशियन गेममध्ये २००६, २०१० व २०१४ला सुवर्णपदक मिळाले. प्रो कबड्डीमध्ये पटना पायरेट्स व यू मुंबाकडून अतिशय चांगली कामगिरी केली. भारतीय कबड्डीमध्ये दिलेल्या योगदानामुळे अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. (वार्ताहर)चांगल्या स्पर्धा : नवीन खेळाडूंना संधीभारतात क्रिकेटनंतर कबड्डी खेळाला लोकप्रियता मिळत आहे. चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. प्रो कबड्डीमुळे चांगली दिशा खेळाडूंना मिळू लागली आहे. त्यातून नवनवीन खेळाडू उदयास येत आहेत. सर्वांत जास्त व उत्कृष्ट खेळाडू भारतात निर्माण होत आहेत. चांगल्या संस्था व व्यक्ती प्रायोजक म्हणून पुढे येत असल्याने खेळाडूंचा आर्थिक स्तर उंचावत आहेत, असे राकेशकुमार म्हणाले.
... तर कबड्डीचे सुवर्ण भारतालाच
By admin | Published: August 26, 2016 1:43 AM