- महेश चेमटे
मुंबई, दि. १ - देशात बॉस्केटबॉल प्रचार-प्रसारासाठी महासंघाची जबाबदारी आहे; पण त्याचबरोबर सरकारसह संबंधित सर्व यंत्रणा एकत्रित आले तरच बास्केटबॉलला अच्छे दिन येतील, असे स्पष्ट मत बास्केटबॉलपटू पलप्रित सिंगने व्यक्त केले. देशभरात झालेल्या बास्केटबॉल टॅलेंट हंट स्पर्धेत विजयी होऊन पलप्रित यूएसए एनबीए मध्ये आपले नशीब आजमावताना दिसणार आहे.मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रिताच्या कार्यक्रमात पलप्रितने ‘लोकमत’शी खास संवाद साधला. पंजाब, लुधियानापासून सुमारे १५० किमी लांब असलेल्या मुक्तसार साहिब या खेडेगावात पलप्रितने बास्केटबॉल खेळाला सुरुवात केली. सुरुवातीला आवड म्हणून खेळत असताना ‘लुधियाना बास्केटबॉल अकादमी’मध्ये प्रवेश घेतल्यानंतर बास्केटबॉलमध्येच आपले करियर बनवण्यासाठी पलप्रितने कसून सराव करण्यास प्रारंभ केला. अकादमीत प्रशिक्षक डॉ. एस. सुब्रम्हण्यम् यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य, राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. राष्ट्रीय बास्केटबॉल कॅम्पमध्ये सहभागी झाल्यांनतर विविध स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्या त्या वेळी खेळाच्या जोरावर त्या संधीचे सोने केले. भारतीय संघात दर्जेदार कामगिरीनंतर आशियाई आणि सॅफ गेममध्ये ही चमक दाखवण्यात मी यशस्वी ठरलो, असे पलप्रितने सांगितले.बास्केटबॉलला शालेय स्तरावर तसेच महाविद्यालयीन स्तरावर चांगला प्रतिसाद आहे. मात्र बास्केटबॉलच्या स्पर्धांची संख्या कमी असल्याने खेळाडू या खेळाकडे आकर्षिला जात नाही. शिवाय या खेळाचा चाहता वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे.प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे खेळ निवडतो. त्या खेळात भविष्यातील संधी ओळखूनच तो खेळाडू त्याप्रमाणे खेळत राहतो. आज देखील महाविद्यालयीन खेळाडू काही काळानंतर खेळ थांबवतात. परिणामी याचा फटका त्या खेळाडूला बसतो. म्हणून कठिण परिस्थीतीही खेळाचा सराव सुरुच ठेवावा. तरुण खेळाडूंना खेळात करिअर बनवण्याच्या दृष्टीने विविध आव्हाने आहेत, मात्र तेवढ्याच संधी देखील आहेत. आव्हानांना सांगा की माझे प्रयत्न सुरु आहे. कोणत्याही गोष्टीमुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने खेळाच्या सरावाला सुरुवात करा.वाईट वाटते पण...सर्वच खेळात पंजाबने देशाला एकापेक्षा एका दर्जेदार खेळाडू दिले आहेत. त्यामुळे आपल्या शहराचे नाव व्यसनाधीन शहर म्हणून चर्चेत येते या गोष्टीचे वाईट वाटते. पण या गोष्टीला आळा घालण्यासाठी पंजाबमधील यंत्रणा सक्षम आहे. मला कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सची कधीच सवय नव्हती, किंबहुना मला कधीच कोणी ‘आॅफर’ ही दिली नाही, असे मत पलप्रित सिंगने व्यक्त केले.