ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 2 - भारतीय कर्णधार विराट कोहलीला मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबतच्या वादाबाबत प्रशासकीय व्यवस्थापक कपिल मल्होत्रा यांनी आपल्या अहवालामध्ये क्लीन चिट दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर माजी लेग स्पिनर अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय संघ मायदेशात किंवा विदेशामध्ये कुठलीही मालिका खेळत असला तरी प्रशासकीय व्यवस्थापकाचा अहवाल अनिवार्य आहे आणि बरेच वेळा हा अहवाल केवळ औपचारिकता असल्याचे मानले जाते. कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने क्रिकेट क्लब आॅफ इंडियाचे मल्होत्रा यांना इंग्लंडमध्ये कोहली-कुंबळे वादावर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, मल्होत्रा यांनी अहवालामध्ये कुठल्याही वादग्रस्त घटनेचा उल्लेख केलेला नसल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, कपिल मल्होत्रा यांनी आपला अहवाल सादर केला आहे. त्यात कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षकासोबत कुठले असभ्य वर्तन केल्याचा, कुठला वाद घडल्याचा किंवा शिस्तभंग केल्याचा उल्लेख नाही. सरावादरम्यान कर्णधार व प्रशिक्षक एकमेकांसोबत बोलत नव्हते, याबाबत विचारले असता अधिकारी म्हणाला, व्यवस्थापकांना केवळ ड्रेसिंग रुममधील माहोल व संघाच्या मनोधैर्यावर परिणाम करणाऱ्या घटनेचा उल्लेख करण्यास सांगितले होते. अहवालामध्ये मात्र असा कुठलाही उल्लेख नाही. बीसीसीआयने अनिल पटेल यांनाही अहवाल मागवला आहे. पटेल भारतात गेल्या मोसमात खेळल्या गेलेल्या 13 कसोटी सामन्यांदरम्ययान प्रशासकीय व्यवस्थापक होते. मल्होत्रा सध्या संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहेत. कुठल्याही राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याची प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून ही अखेरची मालिका आहे. बीसीसीआयतर्फे भविष्यात पूर्णकालीन व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआयने १० जुलै रोजी मुंबईमध्ये प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेण्याची तयारी केलेली आहे. रवी शास्त्री यांना या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मुडी यांच्या व्यतिरिक्त रिचर्ड पायबस, व्यंकटेश प्रसाद, डोडा गणेश यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेले आहेत.
कोहली-कुंबळे संबंधाबाबत कुठली प्रतिकूल प्रतिक्रिया नाही
By admin | Published: July 02, 2017 8:40 PM