- सौरभ गांगुली लिहितात...भारताची पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत गाठ पडणार आहे. बर्मिंघममध्ये आज, रविवारी खेळल्या जाणाऱ्या या लढतीची जागतिक पातळीवर चर्चा आहे. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा विश्वकप स्पर्धेपासून माझ्यासाठी काहीच बदललेले नसून, भारतीय संघाचे पारडे वरचढ आहे. गतविजेता भारतीय संघ मजबूत असून, लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर त्यांना पराभूत करणे कठीण आहे.सराव सामन्यात भारतीय संघ फॉर्मात असल्याचे दिसून आले. कुणी ते केवळ सराव सामने होते असे मत व्यक्त करीत भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेणार नाही, पण भारतीय गोलंदाजी फॉर्मात असल्याचे दिसून आले. सामन्यासाठी कुठल्या वेगवान गोलंदाजांची निवड करायची ही कर्णधार कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. ही त्यांच्यासाठी सकारात्मक डोकेदुखी आहे. तीन वेगवान गोलंदाजांची निवड करायची झाल्यास माझी पसंती उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना राहील. जसप्रीत बुमराहमध्ये डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करण्याची क्षमता असल्यामुळे माझी त्याला पसंती आहे. टी-२० क्रिकेटमुळे त्याने डेथ ओव्हर्समध्ये मारा करण्याचे कौशल्य विकसित केले आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरते. बर्मिंघमची खेळपट्टी चांगली आहे. न्यूझीलंड-आॅस्ट्रेलिया लढतीत मोठी धावसंख्या उभारल्या गेली. इंग्लंडमध्ये अशी खेळपट्टी अपवादानेच बघायला मिळते. या खेळपट्टीवर चेंडू सिम होत नव्हता. भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी फिरकीपटूंची कामगिरी महत्त्वाची ठरेल. त्यामुळे माझ्या मते भारताने रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकीपटूंना संधी द्यायला हवी. खेळपट्टी कोरडी असल्यामुळे मधल्या षटकातील कामगिरीला महत्त्व राहणार आहे. भूतकाळातील लढतीच्या तुलनेत आता भारत-पाक लढतीमध्ये काय फरक आहे ? माझ्या मते यात काहीच बदल झालेला नाही. लढतीबाबत हाईप करण्यात येत असली तरी ही केवळ क्रिकेटची एक लढत आहे. गेल्या १० वर्षांत मानसिकदृष्ट्या भारतीय संघ पाकिस्तानच्या तुलनेत वरचढ असून, आज, रविवारीही यात बदल होणार नाही. (गेमप्लान)
काहीच बदल झालेला नाही...
By admin | Published: June 04, 2017 6:02 AM