चेन्नई : अखिल भारतीय टेनिस महासंघ (एआयटीए) खेळाडूंच्या मदतीसाठी चांगली प्रणाली विकसित करण्यास इच्छुक नाही, असे सांगत अलीकडेच निवृत्ती स्वीकारणाऱ्या सोमदेव देववर्मनने महासंघावर टीका केली. प्रतिभावान खेळाडूंनी सरावासाठी विदेशात जायला हवे, असा सल्ला सोमदेवने यावेळी दिला. सोमदेव चेन्नई ओपन स्पर्धेदरम्यान मीडियासोबत बोलत होता.
एआयटीएपासून निराश आहेस का, असे विचारले असता सोमदेव म्हणाला, ‘मी त्यांच्याकडून कधीच कुठल्या बाबीची आशा केली नाही. त्यामुळे निराश होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. महासंघ मदत करण्यासाठी किंवा प्रणाली तयारी करण्यासाठी इच्छुक नसल्याची मला लवकरच कल्पना आली. मला २००७ च्या डेव्हिस कप स्पर्धेसाठी बोलविण्यात आले होते. मी विमानतळावर अडकलो. त्यावेळी मला कळले की, महासंघ इच्छुक नाही.’सोमदेव पुढे म्हणाला, ‘माझ्या प्रशिक्षकांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांपासून दूर राहण्याचा व कुणालाही दोष न देण्याचा सल्ला दिला होता.
विश्वासपात्र नसलेल्या व्यक्तींवर माझा भरवसा नाही.’ एआयटीएवर टीका करणार नाही, कारण त्यामुळे मला भविष्यात त्यांच्याकडून कुठले काम मिळणार नाही, असे वक्तव्य सुरुवातीला केल्यानंतर सोमदेवने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, माझा अनुभव व मी जसा खेळ केला त्यामुळे भारतीय टेनिसमध्ये बदल घडू शकतो, असेही सोमदेव म्हणाला. सोमदेव म्हणाला, ‘जर मी एआयटीएवर टीका केली तर मला काम मिळणार नाही. मी माझे पर्याय शोधत आहे. मी बऱ्याच चांगल्या बाबी केलेल्या आहेत आणि भारतीय टेनिसला बरेच काही देऊ शकतो.’