मुंबई : भारत-द. आफ्रिका यांच्यात नुकत्याच आटोपलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी नागपुरात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित स्टेडियमवर आयोजिण्यात आली. या सामन्यातील खेळपट्टी खराब असल्याचा अहवाल मॅच रेफ्रीने आयसीसीला पाठविला असून बीसीसीआयला उत्तर देण्यास सांगण्यात आले. बीसीसीआयला मात्र या खेळपट्टीत कुठलीही खोट आढळलेली नाही.खेळपट्टीच्या गुणवत्तेवर जे आरोप लावण्यात आले त्याचा सामना करण्यास आम्ही सज्ज असल्याचे बीसीसीआयने आयसीसीला कळविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मीडियात आलेल्या वृत्तानुसार आयसीसी मॅच रेफ्री जेफ क्रो यांनी दिलेल्या अहवालाशी बीसीसीआय सहमत नाही. खेळपट्टीवरून निर्माण झालेल्या वादळानंतर आयसीसीला उत्तर देण्याची बोर्डाने तयारीदेखील केली आहे. २९ नोव्हेंबरपासून येथे झालेला हा सामना भारताने तीन दिवसांत संपविला होता. या खेळपट्टीवर तिन्ही दिवस फलंदाजांना अक्षरश: नाचावे लागल्याने जगभरातून टीका झाली होती. आयसीसीने १ डिसेंबर रोजी जामठाच्या खेळपट्टीचा अहवाल पाठविण्यासाठी नोटीस बजावली होती. नागपूर खेळपट्टीची गुणवत्ता उच्च दर्जाची असून आपल्याला त्यात कुठलाही दोष अथवा उणीव आढळत नाही. आयसीसीला जे उत्तर अपेक्षित आहे ते देण्याची आमची तयारी असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. बोर्डाला १५ डिसेंबरपर्यंत आयसीसीकडे अहवाल पाठवायचा आहे. भारताने द. आफ्रिकेला मालिकेत ३-० ने पराभूत केले. मोहाली आणि नागपूर कसोटी भारताने तीन दिवसांत जिंकली हे विशेष.(वृत्तसंस्था)नागपूर खेळपट्टीत कुठलाही दोष नव्हता. या खेळपट्टीवर अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने चेंडू वळतो हा आरोपही खोटा आहे. चेंडू वळण्याची प्रक्रिया ही गोलंदाजांच्या क्षमतेवर अवलंबून असते. गोलंदाज विकेटवर चेंडू किती टर्न करू शकतो, हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा भाग आहे.- बीसीसीआयहा सामना भारतीय संघाने तीन दिवसांत १२४ धावांनी जिंकला होता. पहिल्या डावात भारताच्या ७८.२ षटकांत सर्वबाद २१५ धावा झाल्या होत्या. मुरली विजयने ४० धावा केल्या होत्या. द. आफ्रिका संघाकडून मॉर्केलने ३ व हर्मेरने ४ विकेट घेतल्या होत्या.द. आफ्रिकेचा डाव ३३.१ षटकांत १२७ मिनिटांत ७९ धावांत संपुष्टात आला होता. त्यांचे ८ खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. जेपी ड्युमिनीने ३५ धावा केल्या होत्या. भारताकडून आर. आश्विनने ५, तर रवींद्र जडेजाने ४ विकेट घेतल्या होत्या.भारताचा दुसरा ४६.३ षटकांत १७३ धावांत संपुष्टात आला होता. यावेळी शिखर धवने ३९ धावा केल्या होत्या. मॉर्केलने ३, तर ताहिरने ५ विकेट घेतल्या होत्या.तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा डाव ८९.५ षटकांत १८५ धावांत संपुष्टात आला होता. भारताकडून आर. आश्विनने ७, तर अमित मिश्राने ३ विकेट घेतल्या होत्या.
नागपूरच्या खेळपट्टीत दोष नाही
By admin | Published: December 10, 2015 1:01 AM