कोलकाता : भारताचे माजी आॅफ स्पिनर इरापल्ली प्रसन्ना यांनी शुक्रवारी विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहलीवर टीका केली. विराटला जर भारतीय क्रिकेटचा ‘बॉस’ असल्याचे वाटत असेल तर संघाला प्रशिक्षकाची गरज नाही, अशा शब्दात प्रसन्ना यांनी कोहलीवर टीका केली. कोहली व भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणारे कुंबळे यांच्यादरम्यानच्या वादाबाबत प्रसन्ना यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. कोहलीच्या नेतृत्व क्षमतेवरही प्रश्न उपस्थित करताना प्रसन्ना म्हणाले, ‘कोहली चांगला खेळाडू आहे, यात कुठलीच शंका नाही, पण तो चांगला कर्णधार आहे, असे मी म्हणणार नाही.’चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कोहलीचा माझ्या प्रशिक्षण शैलीवर आक्षेप असून त्याच्यासोबतची भागीदारी अस्थिर असल्याचे कुंबळे यांनी म्हटले होते. भारतीय संघ प्रशिक्षकाविना विंडीज दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच वन-डे व एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. प्रसन्ना म्हणाले, ‘अनिल कुंबळेसारख्या दिग्गज क्रिकेटपटूचा आदर केला जात नाही, तर बांगर व श्रीधर यांच्यात कोहलीसोबत चर्चा करण्याचा आत्मविश्वास असेल, असे मला वाटत नाही. या दोघांपैकी कुणीच कुंबळेप्रमाणे अनुभवी नाही.’प्रसन्ना पुढे म्हणाले, ‘कुणाला शारीरिक फिटनेससाठी बोलविणे पुरेसे ठरेल. कर्णधाराचे वर्तन जर असे असेल तर तुम्हाला प्रशिक्षकाची गरज आहे, असे मला वाटत नाही.’ प्रसन्ना पुढे म्हणाले, ‘जर कोहलीने जबाबदारी स्वीकारली तर आपण पुन्हा जुन्या काळात परतू शकतो. त्यावेळी संघावर लक्ष ठेवण्यासाठी व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात येत होती. प्रशिक्षक ही संकल्पना नव्हती.’भारताने आता महेंद्रसिंग धोनी व युवराज सिंग यांच्याबाबत विचार करण्याची वेळ आलेली आहे, असेही प्रसन्ना म्हणाले,प्रसन्ना यांनी सांगितले की,‘धोनी व युवराज २०१९ च्या विश्वकप स्पर्धेतपर्यंत खेळतील, असे मला वाटत नाही. तोपर्यंत ते ३८ वर्षांचे होतील. आपल्याला युवा खेळाडूंची गरज आहे. धोनी यष्टिरक्षकाची भूमिका बजावू शकतो, पण क्षेत्ररक्षक म्हणून युवराज ओझे ठरू लागला आहे. निवड समितीने विंडीज दौऱ्यासाठी जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी होती.’
...तर प्रशिक्षकाची गरज नाही : इरापल्ली प्रसन्ना
By admin | Published: June 24, 2017 2:01 AM