बर्मिंघम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाकिस्तानच्या शानदार पुनरागमनाविषयी प्रभावित असला, तरी त्याने या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलआधी त्याच्या संघाला जास्त चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.भारताने बांगलादेशला नमवून अंतिम फेरीत धडक मारली, तर पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रबळ दावेदार इंग्लंडला पराभूत केले होते. भारताने याआधी साखळी फेरीत पाकिस्तानला धूळ चारली आहे.दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान होणाऱ्या लढतीविषयी विराट म्हणाला, ‘‘त्यांच्या मजबूत आणि कमजोर बाजू लक्षात घेऊन आम्ही याआधी जसे खेळलो तसेच खेळण्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला योजना आखावी लागेल. आम्ही संघ म्हणून जे करीत आहोत त्यात काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे आपल्याला वाटत नाही. एखाद्या निश्चित दिवशी आपले कौशल्य व क्षमतेवर लक्ष देणे आणि स्वत:वर विश्वास ठेवल्याने आम्ही स्वत:ला एक चांगली संधी देऊ. संघ म्हणून काही चांगले करू शकू. सामन्याआधी कोणी विजेता नसतो आणि या खेळात तुम्ही भविष्यवाणी करू शकत नाही. आम्ही काही धक्कादायक निकाल पाहिले आहेत आणि प्रेक्षक ते पाहणे आणि खेळाडूंसाठी याचा एक भाग असणे शानदार आहे. आम्ही फक्त फायनलचा आनंद लुटू इच्छितो.’’स्पर्धेत पाकिस्तान संघाने जोरदार मुसंडी मारल्याने कोहली खूप प्रभावित आहे. तो म्हणाला, ‘‘हो, मी खूप प्रभावित आहे. त्यांचे पुनरागमन शानदार राहिले. निश्चितच तुम्ही फायनलमध्ये पोहोचता तेव्हा तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागते आणि त्यांना त्याचे श्रेय जाते. त्यांनी चांगले पुनरागमन केले.’’ (वृत्तसंस्था)सध्या किती धावा करतो हे महत्त्वाचे नाही बर्मिंघम : आपण किती धावा करतोय हे सध्या महत्त्वाचे नसल्याचे मत बांगलादेशविरुद्ध नाबाद ९६ धावांची खेळी करून भारताला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विराट कोहलीने व्यक्त केले. कोहलीने बांगलादेशविरुद्ध उपांत्य फेरीदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात आठ हजार धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला. या दिग्गज फलंदाजाने स्पर्धेत अन्य फलंदाजांना मोकळे खेळण्याची संधी दिली आणि आवश्यकता पडल्यास स्वत: जबाबदारी पार पाडली. कोहली म्हणाला, ‘‘मी ज्याप्रकारे फलंदाजी करीत आहे त्याचा पूर्ण आनंद लुटत आहे. माझ्यासाठी सध्या धावांच्या संख्येला महत्त्व नाही. मी प्रक्रियेचा आनंद घेत आहे आणि आयपीएलनंतर जी तयारी केली व जो सराव केला त्याचा या स्पर्धेत फायदा होत असल्याने मी खूश आहे. प्रामाणिकपणे सांगायचे म्हटल्यास मी संघाला पुढे घेऊन चाललो असल्याने मी आनंदित आहे.’’ विभिन्न परिस्थितीत कसे खेळतो, हे महत्त्वाचे नसल्याचे कोहलीचे म्हणणे आहे. तो म्हणाला, ‘‘तीन विकेट पडल्या अथवा दोन किंवा एक हे जास्त महत्त्वाचे नाही.’’ (वृत्तसंस्था)
फायनलआधी चिंता करण्याची गरज नाही : विराट कोहली
By admin | Published: June 17, 2017 2:58 AM