महेश चेमटे/ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 15 - रिओ आॅलिम्पिकमध्ये मी माझ्यापरीने सर्वोत्तम खेळ करुन निश्चितच भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल. तसेच पहिल्यांदाच आॅलिम्पिक स्पर्धेत खेळत असून स्पर्धेचे कोणतेही दडपण नसून यासाठी मी खूप उत्सुक आहे, असा विश्वास भारताची युवा टेबल टेनिसपटू मनिक बात्रा हिने व्यक्त केला आहे. रिओसाठी पात्र ठरलेल्या २० वर्षीय टेबल टेनिसपटू मनिकाने मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या. वैयक्तिक प्रशिक्षक संदिप गुप्ता आणि कोरियन प्रशिक्षक पाक मियाँग यांच्या मार्गदर्शनाखाली मनिकाने रिओ स्पर्धेसाठी कसून सराव करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात जपान, टोकियो येथील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात ८ दिवस सराव करुन परतल्याने आत्मविश्वास उंचावला आहे. तसेच फोरहॅन्डवर मी सध्या अधिक मेहनत घेत असल्याचे मनिकाने यावेळी सांगितले.दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी तीन तास सरावासह तज्ज्ञांचे मार्गदर्शनासह यू-ट्यूबवर खेळाच्या चित्रफीत पाहत ती नवे डावपेच आत्मसात करत आहे. भारतातील अव्वल मानांकित असलेली मनिका जागतिक क्रमवारीत ११५ व्या स्थानी आहे. चिली ओपन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ६व्या स्थानावर असलेल्या आणि जपानच्या इशिकावाला नमवून मनिकाने सर्वांचे लक्ष वेधले होते. यानंतर मनिकाने कामगिरीत सातत्य राखले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि सानिया नेहवाल हे आदर्श आहे, असे मनिका सांगते.............................मनिका विजयासाठी कोणत्याही प्रकारचे तडजोड करत नाही. मनिका सर्वात तरुण खेळाडू असून हाच तिचा प्लस पॉइंट आहे. तिचा बॅकहॅण्ड अफलातून आहे. तसेच आता ती फोरहॅण्ड वर मेहनत घेत आहे. गेल्या दोन वर्षांत सातत्यपुर्ण कामगिरी करताना तीने जागतिक क्रमवारीतही झेप घेतली आहे. रिओमध्ये मनिका भारतीयांची मान उंचावेल, यात शंका नाही. भविष्यात जागतिक अव्वल ५० जणांमध्ये ती स्थान मिळवेल, असा विश्वास आहे. - कमलेश मेहता, अर्जुन पुरस्कार विजेते माजी टेबलटेनिसपटू
रिओ स्पर्धेचे कोणतेही दडपण नाही- मनिका बत्रा
By admin | Published: July 15, 2016 8:54 PM