नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमनपद भूषविण्यासाठी आपण बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, या वृत्ताचे शशांक मनोहर यांनी बुधवारी खंडन केले.मंगळवारी मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडताच आयसीसी चेअरमन बनण्यासाठीच मनोहर यांनी अध्यक्षपद सोडल्याचे बोलले जात होते. त्यामागे कारणही तसेच आहे. फेब्रुवारीत आयसीसीने चेअरमनपदासाठी गुप्त मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी दावेदारी करणारा उमेदवार हा एखाद्या बोर्डाशी संबंधित नसावा तर स्वतंत्र असावा.मीडिया वृत्तानुसार मनोहर यांनी वृत्ताचे खंडन करताना सांगितले, की बीसीसीआय अध्यक्ष हे किती भक्कम पद आहे, याची जगाला जाणीव असल्याने आयसीसीमधील पदासाठी मी हे पद का सोडावे? मला वाटले तर मी बीसीसीआयप्रमुख आणि आयसीसी चेअरमन या पदावर कायम राहिलो असतो.’’ मनोहर हे बीसीसीआय अध्यक्ष असताना आॅक्टोबरपासून आयसीसी चेअरमनपददेखील सांभाळत आहेत. बीसीसीआयने त्यांना चेअरमनपदावर नामनिर्देशित केले आहे. जूनपर्यंत चेअरमनपदाचा त्यांचा कार्यकाळ आहे. पण बीसीसीआय अध्यक्षपद सोडताच त्यांना चेअरमनपददेखील सोडावे लागणार आहे. बीसीसीआयप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर चेअरमनपदावर कायम राहणे बेकायदेशीर असल्याचे आपले मत असल्यामुळेच मी राजीनामा दिला.
आयसीसी चेअरमनपदासाठी राजीनामा नाही
By admin | Published: May 12, 2016 2:53 AM