नवी दिल्ली : भारतात आमच्या खेळाडूंच्या जीविताला धोका असल्याचा गाजावाजा करणारे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना आयसीसी टी-२० चषकासाठी त्यांचा संघ भारतात दाखल होताच सुरक्षेबाबतची सर्व चिंता संपल्यासारखी वाटत आहे. पाकिस्तान सरकारच्या सुरक्षाविषयक चिंतेमुळे राष्ट्रीय संघ भारतात उशिरा दाखल झाला. याच कारणास्तव संघाला एका सराव सामन्यास देखील मुकावे लागले होते. भारत-पाक हा सामना देखील पाकच्या मागणीवरून धरमशाला येथून कोलकाता येथे हलविण्यात आला हे विशेष. ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना शहरयार म्हणाले,‘सुरक्षेची चिंता संपली असून अल्लाच्या कृपेने सामने होत आहेत. माझ्यामते मुद्दा राजकीय होता. राजकीय स्वरुपात भारताकडून पाकला अनेक धोके आहेत. एका समूहाकडून पाकला सतत त्रास देण्यात येतो. सुरक्षेबाबतची आमच्या सरकारची चिंता योग्य होती. भारताकडून आश्वासन मिळताच आमच्या सरकारने संघ पाठविण्यात कुठलाही अडसर निर्माण केला नाही. भारताच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता मला कुठलाही धोका आढळत नाही. आमचे येथे जल्लोषात स्वागत झाले. भारतात आम्हाला पाकपेक्षा अधिक प्रेम मिळते, या पाकचा कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या वक्तव्यावर बरेच वादळ माजले. यावर शहरयार खान यांचे मत जाणून घेताच ते म्हणाले, मला आफ्रिदीवर विश्वास आहे. त्याच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढण्यात आला. त्याला तसे म्हणायचे नव्हतेच. त्याच्या बोलण्याचा अर्थ जो निघाला त्यावर जनता नाराज होती. तो वेगळ्या भाषेत सांगू शकला असता. तरीही लहान लहान गोष्टींवर भाष्य करणे योग्य नाही. आफ्रिदीच्या वक्तव्यापेक्षा त्याचा दृष्टिकोन विचारात घ्यायला हवा, असे माझे मत आहे. मी आफ्रिदीचे समर्थन करतो.’(वृत्तसंस्था)
भारतात कुठलाही धोका नाही : शहरयार खान
By admin | Published: March 20, 2016 4:06 AM