नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी भारताची बाजू घेताना नागपूरच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीमध्ये काहीच चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. नागपूर कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा तीन दिवसांमध्ये पराभव केला होता. चॅपेल म्हणाले, ‘‘जगभरात वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांचे डोळे मिटून समर्थन केले जाते.’’व्हीसीए जामठाची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल होती. भारताने तीन दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा १२४ धावांनी पराभव केला. आयसीसीने खेळपट्टी ‘खराब’ असल्याचे स्पष्ट करताना याबाबत बीसीसीआयकडून अहवाल मागविला होता. ‘‘चॅपेल यांनी भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी खेळपट्टीबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. शास्त्री व कोहलीने म्हटले होते, की आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काही सामने तीन दिवसांमध्ये संपतात. त्यामुळे नागपूरच्या खेळपट्टीमध्ये काही चुकीचे आहे, असे वाटत नाही.’’नागपूर व अॅडिलेड येथील खेळपट्ट्यांबाबत चर्वितचर्वण सुरू आहे. कसोटी सामने झटपट संपत आहेत, यासाठी खेळपट्टी जबाबदार आहे की खेळाडू? याबाबत बोलताना चॅपेल म्हणाले, ‘‘भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी योग्य उत्तर दिले. आयसीसी जर नागपूरच्या खेळपट्टीची चौकशी करीत असेल तर अॅडिलेडच्या खेळपट्टीची चौकशी का करीत नाही. तेथेही सामना कमी वेळेत संपला होता.’’गेल्या महिन्यात अॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा तीन दिवसांमध्ये पराभव केला होता. जर खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल असेल तर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीच्या तुलनेत खराब कशी ठरू शकते, असा सवाल चॅपेल यांनी उपस्थित केला आहे. चॅपेल म्हणाले, ‘‘एक चांगला फलंदाज कुठल्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करीत आणि कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असतो. त्याचा त्याला अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे. जर खेळपट्टी पहिल्या दिवशी फिरकीला अनुकूल असेल तर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीच्या तुलनेत ती खराब कशी ठरवता येईल. यामुळे चांगली खेळपट्टी कुठली, असा प्रश्न उपस्थित होतो. बॅट व बॉलमध्ये लढत अनुभवण्याची संधी देणारी खेळपट्टी चांगली असते. याचा अर्थ प्रत्येक विभागानुसार चांगली खेळपट्टी वेगवेगळी असू शकते. काही स्थळांवर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते तर काही स्थळांवर फिरकीपटूंसाठी सहायक असते.’’ चॅपेल यांनी आंतरराष्ट्रीय संघांना क्युरेटरला दोष देण्यापेक्षा खेळाडूंच्या तंत्रावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. (वृत्तसंस्था)
नागपूरच्या खेळपट्टीत काहीच चुकीचे दिसले नाही
By admin | Published: December 13, 2015 11:24 PM