कोलकाता : रिओ आॅलिम्पिकसाठी क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर झालेली ३० लाख रुपयांची मदत अजूनही आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याची धक्कादायक माहिती भारताचा स्टार गोल्फर एसएसपी चौरासियाने दिली. याविषयी त्याने आपला संताप व्यक्त करताना भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) आणि क्रीडा मंत्रालयाला चांगलेच फटकारले. मिळालेल्या माहितीनुसार, चौरासिया आणि त्याचा सहकारी खेळाडू अनिर्बान लाहिडी यांना क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली रक्कम अद्याप मिळालेली नाही. आयओए अधिकाऱ्यांकडून रिओ आॅलिम्पिकदरम्यान मिळालेली वागणूक अत्यंत वाईट असल्याचे सांगताना चौरासियाने आयओए अधिकाऱ्यांनी आम्हाला एक नोकर म्हणून वागणूक दिली, असे म्हटले.प्रसारमाध्यमांशी बोलताना चौरासियाने सांगितले की, ‘रिओ आॅलिम्पिक स्पर्धा समाप्त होऊन चार महिने झाले आहेत. शिवाय अधिकाऱ्यांनी अनेक कागदोपत्री व्यवहारही केले आहेत. मात्र, तरीही जगातील १६ विजेतेपद पटकावलेल्या लाहिडीला अद्याप एकही रुपया मिळालेला नाही.’ चौरासियाने दिलेल्या माहितीनुसार त्याला स्वत:ला आतापर्यंत केवळ ५.५ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. आम्हाला ३० लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन केले आहे. मात्र, रिओनंतर ही रक्कम १५ लाखपर्यंत कमी केल्याचे आम्हाला सांगण्यात आले.रिओतील अनुभवाविषयी चौरासिया म्हणाला की, ‘तेथे वाहन व्यवस्थेसह कोणतीही योग्य सुविधा नव्हती. शिवाय इतकी थंडी आणि पाऊस होता की, आमच्यासाठी छत्री किंवा रेनकोटचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. आयओए अधिकारी आमच्याशी असे व्यवहार करीत होते जणू आम्ही त्यांचे नोकरच आहोत.’
आॅलिम्पिकची मदत अजूनही मिळाली नाही
By admin | Published: December 23, 2016 1:25 AM