नवी दिल्ली : कारकिर्दीतील धक्कादायक दुखापतींना सामोरे जाणारा भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपला जानेवारी महिन्यात प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेदरम्यान खांद्याच्या दुखापतीने सतावले होते. खांद्याच्या दुखापतीनंतर पुन्हा खेळू शकेल का, याबाबत साशंकता होती, असे पारुपल्ली कश्यपने सांगितले. आॅक्टोबर २०१५ मध्ये पोटरीच्या दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतल्यानंतर कश्यपचा मार्ग सोपा नव्हता. त्याला फिटनेस मिळवण्याची संघर्ष करावा लागला. पोटरीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर जर्मन ओपनमध्ये कश्यपला गुडघ्याच्या दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याचे आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले. जवळजवळ तीन वर्षांच्या कालावधीनंतर कश्यपने कोरियाच्या क्वांग ही हियोचा १५-२१, २१-१५, २१-१६ ने पराभव करीत रविवारी अमेरिकन ओपन ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. सिरी फोर्ट क्रीडा संकुलात एच.एस. प्रणयविरुद्ध पीबीएलच्या लढतीदरम्यान कश्यपच्या खांद्याला दुखापत झाली होती. कश्यप म्हणाला, ‘त्यानंतर माझ्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे मला तीन महिने विश्रांती घ्यावी लागली. दरम्यान, जर मला स्मॅश लगावता आले नाही तर पुन्हा खेळता येईल, असा प्रश्न वारंवार सतावत होता. या दुखापतीतून सावरल्यानंतर कश्यप चीन ओपनमध्ये सहभागी झाला होता, पण त्या स्पर्धेत त्याला स्नायूच्या दुखापतीने सतावले. कश्यप म्हणाला, ‘नव्या प्रशिक्षकांनी खेळाडूंसाठी तयार केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात कार्यक्रमात मी सहभागी होण्याचा प्रयत्न केला, पण थायलंड ओपनच्या १० दिवसांपूर्वी मला स्नायूच्या दुखापतीने सतावले.’कश्यपची नजर आता पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवण्यावर आहे. तो माझ्या कारकिर्दीतील सर्वांत खडतर कालावधी होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आॅलिम्पिकला मुकावे लागले तरी मी मनोधैर्य ढासळू दिले नाही. या दुखापतीतून सावरण्यावर लक्ष केंद्रित केले. २०१७ हे माझे वर्ष राहील, असा मला विश्वास होता. कोरियामध्ये उपांत्य फेरी गाठल्यानंतर आत्मविश्वास उंचावला, पण पीबीएलमध्ये खांद्याला दुखापत झाल्यामुळे माझे मनोधैर्य ढासळले होते. - पारुपल्ली कश्यप
पुन्हा खेळता येईल याची कल्पना नव्हती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 1:19 AM