हैदराबाद : नुकताच झालेल्या इंडोनेशियन ओपन सुपर सिरिज स्पर्धेत सलग दोन सामन्यांत दिग्गज खेळाडूंना मात देत खळबळ माजवलेल्या भारताच्या स्टार शटलर एचएस प्रणॉयने म्हटले की, ‘मोठे विजेतेपद जिंकण्यासाठी कामगिरीत सातत्य राखण्याचे माझे लक्ष्य आहे.’ या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या इंडोनेशिय ओपन स्पर्धेत सलग दोन दिवसांमध्ये प्रणॉयने ओलिम्पिक चॅम्पियन चेन लाँग आणि रौप्य पदक विजेत्या ली चोंग वेई यांना नमवले होते. जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीमध्ये सध्या प्रणॉय २१व्या स्थानी आहे. गोपीचंद अकादमीमध्ये सराव करत असलेल्या प्रणॉयने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘चेन लाँगला नमवणे खरंच विशेष होते आणि त्यानंतर ली चोंग वेईला धक्का देणे माझ्यासाठी जास्त समाधानकारक होते.’ दरम्यान, स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात प्रणॉयला जपानच्या काजुमासा सकाईविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागला होता.प्रणॉय पुढे म्हणाला की, ‘या विजयानंतर माझा आत्मविश्वास खूप वाढला. मात्र, यापुढे मला अधिक सातत्यपुर्ण कामगिरी करावी लागेल. माझ्या मते केवळ चांगले प्रदर्शन करणेच पुरेसे नाही.’ त्याचप्रमाणे, त्याने आपल्या पुढील स्पर्धांविषयी बोलताना म्हटले की, ‘मानसिक तयारी एका खेळाडूच्या प्रगतीमध्ये मोठी भूमिका निभावते.’ पुढील महिन्यात तो अमेरिका, कॅनडा आणि न्यूझीलंड स्पर्धेत सहभागी होईल. (वृत्तसंस्था)
मोठ्या विजेतेपदांसाठी सातत्य राखावे लागेल
By admin | Published: June 29, 2017 12:42 AM