वासिम आक्रम लिहितो़...पाकिस्तानचा संघ शांत व नियंत्रणामध्ये दिसत आहे. बांगलादेशविरुद्ध पाकने दिमाखदार विजय मिळवला. त्यात संघाची देहबोली सर्वांत सकारात्मक बाब आहे. या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो. आघाडीच्या फळीतील तीन्ही फलंदाजांनी धावा फटकावल्या, ही सुखावणारी बाब आहे. त्यापूर्वी आघाडीच्या फळीतील फलंदाज संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. शाहिद आफ्रिदीही लवकर फलंदाजीला आला आणि धावा फटकावण्यात यशस्वी ठरला. या व्यतिरिक्त क्षेत्ररक्षणही दर्जेदार होते. मैदानात जर खेळाडूची कामगिरी चांगली झाली नाही तर त्याच्यावर दडपण येते. आफ्रिदीही यापेक्षा वेगळा नाही. त्याने टीकाकारांना चोख उत्तर दिले. त्याने नेतृत्व करताना धावाही फटकावल्या आणि बळीही घेतले. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वांत अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. अहमद शहजादने संघात शानदार पुनरागमन केले. शहजादसारख्या खेळाडूची पाठराखण करणे आवश्यक आहे. आशिया कप स्पर्धेत त्याला संघाबाहेर का ठेवण्यात आले, हे न उलगडणारे कोडं आहे. खेळाडू व व्यक्ती म्हणून तो परिपक्व होत आहे. या व्यतिरिक्त तो शानदार क्षेत्ररक्षकही आहे. बांगलादेशने सुरुवातीच्या काही षटकांमध्ये लय गमावली होती. बांगलादेशने सुरुवातीलाच शरणागती पत्करली असल्याचे चित्र दिसले. बांगलादेश संघ आशिया कप स्पर्धेत वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यावर खेळल्यानंतर येथे दाखल झाला. ईडनची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल होती, पण बांगलादेश संघ धोकादायक आहे, या मतावर मी आजही ठाम आहे.पाक संघाकडे सर्वोत्तम गोलंदाजी आहे, असे वक्तव्य करणे घाईचे ठरेल. संघाची कामगिरी कशी होते, यावर ते अवलंबून आहे, पण पाकची गोलंदाजी सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमणापैकी एक आहे. यात विविधता आहे. संघाने पहिल्या लढतीत तीन डावखुऱ्या गोलंदाजांना संधी दिली. आफ्रिदी व इमाद या दोन फिरकीपटूंच्या समावेशामुळे पाकचे आक्रमण तुल्यबळ झाले आहे. या व्यतिरिक्त शोएब मलिक अचूक मारा करण्यास सक्षम आहे. (टीसीएम)
पाकविरुद्ध यजमान संघावर दडपण राहील
By admin | Published: March 18, 2016 3:33 AM