लंडन : नोव्हाक जोकोव्हिचने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तीनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या जोकोव्हिचने चेक प्रजासत्ताकच्या अॅडम पावलेसेकचा १ तास ३४ मिनिटांमध्ये ६-२, ६-२, ६-१ ने पराभव केला. पुढच्या फेरीत जोकोव्हिचला अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन डेल पोत्रो व लाटवियाचा अर्नेस्ट गुलबिस यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जोकोव्हिचने यापूर्वी २०११, २०१४ व २०१५ मध्ये विम्बल्डन स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला आहे. दरम्यान, स्पेनचा डेव्हिड फेरर २०१३ नंतर प्रथमच विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसने पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या सेटनंतर माघार घेतली त्यावेळी फेरर ३-० ने आघाडीवर होता. बुल्गारियाच्या ग्रीगोर दिमित्रोव्हाने सायप्रसच्या मार्कोस बागदातिसचा ६-३, ६-२, ६-१ ने सहज पराभव केला. यंदा आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये अँडी मरेचा पराभव करीत चर्चेत आलेल्या जर्मेनीच्या मिशा जेवरेवने कजाखस्तानच्या मिखाइल कुकशिकिनची झुंज ६-१, ६-२, २-६, ३-६, ६-४ ने मोडून काढली. महिला विभागात स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाने इकटेरिना मकरोव्हाचा ६-०, ७-५ ने तर कोको वांडेवागेने तातजना मारियाचा ६-४, ६-२ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)सानिया दुसऱ्या फेरीत; पेसचे आव्हान संपुष्टातसानिया मिर्झाने महिला दुहेरीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्धी जोडीवर मात करीत दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे पहिले दोन सेट जिंकल्यानंतरही कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या भारताच्या लिएंडर पेसला पहिल्याच फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. कॅनडाच्या आदिल शम्सदिनसह खेळताना पेसला ज्युलियन नोवले - फिलिप ओसवाल्ड या आॅस्ट्रियाच्या जोडीविरुद्ध ६-४, ६-४, २-६, ६-७(२-७), ८-१० असा अनपेक्षित पराभव पत्करावा लागला.
नोव्हाक जोकोव्हिच तिसऱ्या फेरीत
By admin | Published: July 07, 2017 1:25 AM