चेंगझोऊ : चौथी मानांकित पी. व्ही. सिंधू, सातवी मानांकित एच. एस. प्रणय, ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही महिलांची दुहेरी जोडी तसेच प्रणव जेरी चोपडा व अक्षय देवालकर या पुरुष जोडीने शानदार कामगिरी करून बुधवारी चायना मास्टर्स ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळविला.ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने मलेशियाच्या मेई कुआन चाऊ आणि मेंग यीन ली यांचा ३८ मिनिटांत २१-१६, २१-१८ असा पराभव केला. भारतीय जोडीची आता पुढील फेरीतील लढत चिनी-तैपेईच्या चेन आणि वू ती जुंग यांच्याशी होईल.प्रणय आणि देवालकर यांनी सिंगापूरच्या योंग केई टॅरी ही आणि किएन हिएन लोह यांचा २१-१८, २१-१३ असा पराभव करताना दुसरी फेरी गाठली. आता त्यांची लढत सातव्या मानांकित चीनची जचोडी वांग यिल्यू आणि झांग वेन यांच्याविरुद्ध होईल; परंतु आठव्या मानांकित मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी या जोडीचे पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. या जोडीवर हॉलंडचा रुश बॉश आणि न्यूझीलंडचा ओनिवर लेडन डेव्हिसने ३१ मिनिटांत २१-१९, २१-१६ असा विजय मिळविला. त्याआधी तृतीय मानांकित किदांबी श्रीकांतला पहिल्या फेरीत चिनी-तैपेईचा लिन यू सीएन याच्याकडून १२-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला होता. >सिंधूने जपानच्या नत्सुकी निदाइरा हिचा ३४ मिनिटांत २१-१६, २१-१२ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली, तर प्रणयने चीनचा हुआंग युजियांग याचा ३४ मिनिटांत २१-१३, २१-११ असा पराभव करून तिसरी फेरी गाठली.
सिंधू दुसऱ्या, प्रणय तिसऱ्या फेरीत
By admin | Published: April 21, 2016 4:14 AM