रांची : कर्णधार स्टीव्हन स्मिथचे (नाबाद ११७ धावा, १३ चौकार) शतक व त्याने ग्लेन मॅक्सवेलसोबत (नाबाद ८२ धावा, ५ चौकार, २ षटकार) केलेल्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने भारताविरुद्ध गुरुवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर ४ बाद २९९ धावांची मजल मारली. दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएसमुळे वाद निर्माण झाला होता; पण स्मिथने सर्व विसरून आज १९ वे कसोटी शतक झळकावले. आजचा खेळ थांबला त्या वेळी शतकवीर स्मिथला अडीच वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा ग्लेन मॅक्सवेल अर्धशतक झळकावित साथ देत होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४७.४ षटकांत १५९ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच अर्धशतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांसाठी आजचा दिवस खडतर ठरला. त्यात आणखी एका वाईट वृत्ताची भर पडली. कर्णधार विराट कोहली क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो एका सत्रापेक्षा अधिक वेळ मैदानाबाहेर होता. कोहलीच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले. एकवेळ आॅस्ट्रेलियाची ४ बाद १४० अशी अवस्था होती. उमेश यादवने (१९ षटकांत ६३ धावांच्या मोबदल्यात २ बळी) रिव्हर्स स्विंगचा शानदार नमुना सादर केला; पण आजचा दिवस आॅस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने गाजवला. त्याने भारताविरुद्ध गेल्या सात सामन्यांतील आपले सहावे कसोटी शतक झळकावले. सुरुवातीला खेळपट्टी संथ होती. भारतीय फिरकीपटूंना खेळपट्टीकडून विशेष साथ लाभली नाही. आश्विन (२३ षटकांत ७८ धावांच्या मोबदल्यात १ बळी) आणि जडेजा (३० षटकांत ८० धावांच्या मोबदल्यात १ बळी) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उमेशचा मारा सावधपणे खेळून काढल्यानंतर स्मिथने भारताच्या अन्य गोलंदाजांना सहजपणे तोंड दिले. मुरली विजयच्या गोलंदाजीवर लाँग आॅन बाऊंड्रीवर चौकार वसूल करीत स्मिथने या मालिकेतील दुसरे शतक झळकावले. दरम्यान, स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा पल्ला सर्वांत जलद गाठणारा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमनने ३६ व्या, तर सुनील गावस्कर यांनी ५२ व्या कसोटी सामन्यांत पाच हजार धावांचा पल्ला गाठण्याची कामगिरी केली होती. भारताने ८६ व्या षटकांत दुसरा नवा चेंडू घेतला; पण यजमान संघाला बळी घेण्यात यश आले नाही. त्याआधी, दुसऱ्या सत्रात आॅस्ट्रेलियाने पीटर हँड्सकोंबच्या (१९) मोबदल्यात ३० षटकांत ८५ धावा वसूल केल्या. यजमान संघाने पहिल्या दोन तासांमध्ये तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. पहिल्या सत्रात आॅस्ट्रेलियाची ३ बाद १०९ अशी स्थिती होती. यजमान संघाचा विचार करता दुसरे सत्र निराशाजनक राहिले. भारतीय गोलंदाजांमध्ये उमेश यादव सर्वाधिक प्रभावी भासला. त्याने दुसऱ्या सत्रात शानदार इनस्विंग यॉर्करवर हँड्सकोंबला पायचित केले. त्यानंतर मात्र स्मिथ व मॅक्सवेल यांनी डाव सावरला. त्याआधी, स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मॅट रेनशॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला सकारात्मक सुरुवात करून दिली. आॅस्ट्रेलियाने ९.३ षटकांत संघाला अर्धशतक गाठून दिले. दहाव्या षटकात रवींद्र जडेजाने वॉर्नरला तंबूचा मार्ग दाखवित भारताला पहिले यश मिळवून दिले. चांगली सुरुवात करणाऱ्या मॅट रेनशॉचा (४४) अडथळा उमेशने दूर केला. आश्विनने पुन्हा एकदा शॉन मार्शला (२) जाळ्यात अडकवले. त्याला बाद करण्यासाठी भारताने डीआरएसचा वापर केला. भारताने आज संघात एक बदल केला. अभिनव मुकुंदच्या स्थानी फिट असलेल्या मुरली विजयला संघात स्थान दिले. आॅस्ट्रेलियाला दोन बदल करावे लागले. मिशेल मार्श व मिशेल स्टार्क दुखापतग्रस्त असल्यामुळे त्यांच्या स्थानी ग्लेन मॅक्सवेल व पॅट कमिन्स यांना संधी देण्यात आली. (वृत्तसंस्था)पहिल्या दोन लढतींच्या तुलनेत खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल : स्मिथ1पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत येथील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असल्याचे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केले. आयसीसीने पहिल्या दोन सामन्यांतील खेळपट्ट्यांना अनुक्रमे ‘खराब’ व ‘दुय्यम दर्जाची’ असा शेरा दिला होता. 2खेळपट्टीबाबत बोलताना शतकवीर स्मिथ म्हणाला, ‘येथे चेंडू अधिक वळला नाही. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत चेंडू अधिक वळत होता. येथे चेंडू समतोल उसळत आहे. पहिल्या डावात पाहिजे तेवढ्या धावा फटकावता येतील.’3स्मिथने ग्लेन मॅक्सवेलची प्रशंसा केली. स्मिथ म्हणाला, ‘चांगली धावसंख्या उभारण्यासाठी भागीदारी करणे महत्त्वाचे होते. मॅक्सने शानदार खेळ केला. त्याने योजनाबद्ध फलंदाजी केली. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे.’ दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र महत्त्वाचे ठरेल : रेनशॉभारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा राहील, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅट रेनशॉने व्यक्त केली. स्टीव्ह स्मिथचे नाबाद शतक व ग्लेन मॅक्सवेलची कारकिर्दीतील सर्वोत्तम ८२ धावांच्या खेळी याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद २९९ धावांची मजल मारली. रेनशॉ म्हणाला,‘माझ्या मते शुक्रवारी पहिल्या सत्राचा खेळ महत्त्वाचा ठरेल. त्या सत्रात आम्ही यशस्वी ठरलो तर हा कसोटी सामना जिंकण्याची पायभरणी करू शकतो. स्मिथने संयमी फलंदाजी केली. मॅक्सवेल चांगला खेळाडू असून, आज त्याने दमदार खेळी करीत ते सिद्ध केले आहे.’ धावफलकआॅस्ट्रेलिया पहिला डाव :- मॅट रेनशॉ झे. कोहली गो. यादव ४४, डेव्हिड वॉर्नर झे. व गो. जडेजा १९, स्टीव्हन स्मिथ खेळत आहे ११७, शॉन मार्श झे. पुजारा गो. आश्विन ०२, पीटर हँड््सकोंब पायचित गो. यादव १९, ग्लेन मॅक्सवेल खेळत आहे ८२. अवांतर (१६). एकूण ९० षटकांत ४ बाद २९९. बाद क्रम : १-५०, २-८०, ३-८९, ४-१४०. गोलंदाजी : ईशांत १५-२४६-०, यादव १९-३-६३-२, आश्विन २३-२-७८-१, जडेजा ३०-३-८०-१, विजय ३-०-१७-०.----------------कोहली दुखापतग्रस्तभारतीय कर्णधार विराट कोहलीला आॅस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज उपाहारानंतर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. ४० व्या षटकात डीप मिडविकेटला चौकार रोखण्याच्या प्रयत्नात कोहलीने सूर लगावला. त्या वेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली. खांद्याला पकडूनच तो मैदानाबाहेर आला. भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट मैदानावर आले आणि कर्णधाराला मैदानाबाहेर घेऊन गेले. कोहली चहापानानंतरही मैदानावर परतला नाही. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कर्णधाराची जबाबदारी सांभाळली. कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने चांगले नेतृत्व केले : आर. श्रीधरपाटा खेळपट्टीवर प्रभारी कर्णधार विशेष काही करू शकत नव्हता; पण त्याने खेळाडूंसोबत संवाद साधत संघात जोश कायम राखला, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी सांगितले. आॅस्ट्रेलियाच्या डावातील ४० व्या षटकात विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर रहाणेने संघाचे नेतृत्व केले. श्रीधर म्हणाले, ‘अजिंक्यने आपली भूमिका चोख बजावली. तो सीनिअर्स आश्विन व ईशांतकडून सल्ला घेत होता. विराटच्या अनुपस्थितीत त्याने संघात जोश कायम राखला. तो वारंवार गोलंदाजांसोबत संवाद साधत होता.’श्रीधर पुढे म्हणाले, ‘या मालिकेत फलंदाजांसाठी हा सर्वांत चांगला दिवस होता. खेळपट्टी पाटा असून शुक्रवारी काय घडते, याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या दिवशी दडपणाखाली असल्यानंतरही भारतीय संघात वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे. इंग्लंडविरुद्ध मुंबई व चेन्नईमध्ये याची प्रचिती आली आहे.’ कोहलीची दुखापत गंभीर नाही : बीसीसीआयकर्णधार विराट कोहलीची खांद्याची दुखापत गंभीर नसून, तो उपचारानंतर तिसऱ्या कसोटीत उर्वरित दिवशी खेळू शकेल, असा डॉक्टरांचा तपासणी अहवाल भारतीय संघ व्यवस्थापनाकडे प्राप्त झाल्यानंतर, संघाच्या खेळाडूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला असल्याचे बीसीसीआयच्या वतीने वृत्तसंस्थेला सांगण्यात आले. गुरुवारी उपहारानंतरच्या सत्रात चौकार वाचविण्याच्या प्रयत्नात कोहलीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. बीसीसीआयने स्पष्ट केले की, कोहलीच्या खांद्याचा स्नायू ओढला गेल्यामुळे त्याला खूप त्रास होत होता. मैदान सोडल्यानंतर त्याच्यावर डॉक्टरांनी लगेचच उपचार सुरू केले. रात्री उशिरा डॉक्टरांनी बीसीसीआयला कळविले की, दुखापत गंभीर नसून त्यावर योग्य ते उपचार आम्ही करीत आहोत. ज्यामुळे उर्वरित दिवशी विराटला खेळता येऊ शकेल.
तिसरी कसोटी : स्मिथ-मॅक्सवेलची दीडशतकी भागीदारी, कांगारू ४ बाद २९९ धावा
By admin | Published: March 17, 2017 12:35 AM