Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक.... ही स्पर्धा १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर विजय मिळवून भारतीय पुरुष संघाने इतिहास घडवला. थॉमक चषक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. भारताने उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा थरारक विजय मिळवला होता, तत्पूर्वी त्यांनी मलेशियावर मात केली होती. उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताने कांस्यपदक पक्के केले होते, परंतु त्यांनी थेट सुवर्णपदकावर नाव कोरले. लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टीव, किदम्बी श्रीकांत, एम आर अर्जुन, ध्रुव कपिला व एचएस प्रणॉय हे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.
आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतासमोर तगड्या इंडोनेशियाचे आव्हान होते. इंडोनेशियाच्या पुरुष संघाने सर्वाधिक १४ वेळा थॉमस चषक उंचावला आहे. पण, भारतीय खेळाडूंच्या मजबूत निर्धारासमोर त्यांनी हार मानली. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने ( Lakshya Sen) कडव्या संघर्षानंतर इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटींगवर ८-२१, २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर लक्ष्यने दमदार पुनरागमन केले. ७-१२ अशा पिछाडीवरून लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये कमबॅक करताना २१-१७ अशी बाजी मारली आणि त्यानंतर निर्णायक गेममध्ये २१-१६ असा विजय मिळवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
दुहेरीत सात्विकराज रँकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. मोहम्मद अहसेन व केव्हिन संजया सुकामुल्जो यांच्या विरुद्धचा दुसरा गेम कमालीचा चुरशीचा झाला. पण, भारतीय जोडी वरचढ ठरली. सात्विक व चिराग यांनी हा सेट १८-२१, २३-२१, २१-१९ असा जिंकून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली.