धरमशाळा येथे होणारा भारत - आॅस्टे्रलियादरम्यानचा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार असून, हा सामना नव्या मैदानावर खेळवला जात असल्याने खेळपट्टी कशी असेल, याचा अंदाज कोणालाही लावता येणार नाही. तरी, सर्वांच्या मते येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देईल. येथील वातावरणही वेगवान गोलंदाजांना पूरक आहे; तसेच आतापर्यंत ज्यांनी ही खेळपट्टी पाहिली त्यांचे म्हणणे आहे की, येथे अजून गवत आहे. तसेच, जरी गवत कमी केले, तरी कमीत कमी पहिले एक - दोनतास ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. त्यामुळे एकूणच थोडीफार का होईना; पण या सामन्याची स्थिती आॅस्टे्रलियाच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आहे. कदाचित यामुळेच भारतीय चमूमध्ये मोहम्मद शमीची वर्णी लागली आहे. तो खेळेल की नाही ही नंतरची बातमी असेल; परंतु भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज खेळवेल असेच चित्र आहे. शिवाय, मोठी कसोटी असल्याने एका फलंदाजाला बसवून एक अतिरिक्त गोलंदाज खेळविण्यात येऊ शकतो. त्याचवेळी, एका फलंदाजाला बसवण्याचा अर्थ म्हणजे, संघाची फलंदाजी काहीप्रमाणात कमजोर होईल. त्यामुळेच, या मालिकेत आतापर्यंत लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी करणे आवश्यक ठरणार आहे. दुसरीकडे, आॅस्टे्रलियाचा विचार करता त्यांना विजय मिळवण्याचा आत्मविश्वास असेल. त्यांनी ज्याप्रकारे रांची सामना अनिर्णीत राखला, ते पाहता त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असणार. त्यांची फलंदाजी खास करून स्टीव्ह स्मिथ चांगले फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजांनीदेखील मिशेल स्टार्कची कमतरता भासू दिलेली नाही. त्याचवेळी वेगात मारा करण्याची आणि उसळी देण्याची क्षमता असलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स भारतीयांची डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळे माझ्यामते, आॅस्टे्रलियादेखील आणखी एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवू शकतो, असे दिसत आहे. दोन फिरकी गोलंदाजांपैकी एकाला बसवून बर्डला अंतिम संघात स्थान मिळू शकते. पण, मला वाटते की मालिकेत आॅस्टे्रलिया अंडरडॉग राहिले आहेत आणि खेळदेखील तोडीस तोड झालेला आहे. याकडे पाहता निर्णायक सामन्यात कांगारू आपल्याला संभाव्य विजेता बघत असेल. कारण, भारतीय संघावर दडपण असेल. शिवाय, मालिकेतील कोहली - स्मिथ प्रकरण व इतर वादाकडे पाहता, सामना एकप्रकारे वेगळ्या स्तरावर जातो. यामुळे खेळाडू चांगली कामगिरी करतातच, त्याचबरोबर त्यांच्यावर अतिरिक्त दबावही येतो. त्यामुळे, या कसोटीत भारताला काहीसे सावधपणे खेळावे लागेल. त्यामुळे या सामन्यात निश्चितच ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल.
‘काँटे की टक्कर’ होणार
By admin | Published: March 23, 2017 11:34 PM