दुबई : सुंदरसिंग गुर्जर याने खांद्याच्या दुखापतीनंतरही जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपदमध्ये पुरुषांच्या एफ ४६ भालाफेकीत जेतेपदाचा सोमवारी यशस्वीपणे बचाव केला. गुर्जरसह कांस्य विजेता अजितसिंग आणि रिंकू यांनीही टोकियो पॅरालिम्पिकचा कोटा मिळविला.गुर्जरने ६१.२२ मीटर भालाफेक करीत अव्वल स्थान घेतले. यंदाच्या मोसमातील ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. अजित सिंगने ५९.४६ मीटर भालाफेक करीत तिसरे आणि रिंकूने चौथे स्थान घेतले. आंतरराष्टÑीय पॅरालिम्पिकच्या नियमानुसार जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपदच्या प्रत्येक स्पर्धेत पहिल्या चार स्थानावरील खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील.२३ वर्षांच्या गुर्जरने येथे लंडन २०१७ च्य विश्व स्पर्धेत मिळविलेल्या जेतेपदाचा बचावच केला नाही, तर जागतिक अजिंक्यपदमध्ये दोन पदके मिळविणारा तो दुसरा भारतीय खेळाडूही बनला. देवेंद्र झझारियाने २०१३ च्या लियोन व २०१५ च्या दोहा स्पर्धेत सुवर्ण व रौप्य जिंकले होते.गुर्जर पाचव्या प्रयत्नांपर्यंत दुसऱ्या स्थानावर होता. सहाव्या प्रयत्नात ६१.२२ मीटर भालाफेक करीत त्याने लंकेचा दिनेश् हेराथ याला मागे टाकले. लंकेच्या खेळाडूने पहिल्या प्रयत्नात ६०.५९ मीटर भालाफेक केली होती. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य जिंकले आहे.
तीन भारतीयांनी मिळविले पॅराऑलिम्पिकमध्ये स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 4:07 AM