ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २२ - भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा व उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ८ बाद १५८ अशी झाली आहे. भारत विजयापासून फक्त दोन विकेट दूर असून वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवण्याचा मोका भारताला मिळाला आहे.
वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत व दक्षिण आफ्रिका हे संघ आमने सामने आहेत. भारताने दिलेले भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला उतरली. भारताच्या अवघ्या नऊ धावा झाल्या असताना रोहित शर्मा शून्यावर असताना धावबाद झाला. धवनने तिस-या क्रमांकावर आलेल्या विराटच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. पाकपाठोपाठ आफ्रिकेविरोधातही धवन - कोहली जोडीने भारताचा डाव सावरला. या जोडीने शतकी भागीदारी रचली. विराट कोहली ४६ धावांवर असताना इम्रान ताहीरच्या फिरकीवर झेलबाद झाला. यानंतर धवन आणि अजिंक्य रहाणे या जोडीने डाव पुढे नेला. शिखर धवनने दिमाखदार शतक ठोकले तर अजिंक्य रहाणेनेही तडाखेबाज अर्धशतक ठोकले. ही जोडी भारताला ३०० चा टप्पा गाठून देईल असे वाटत असतानाच धवन १३७ धावांवर बाद झाला. धवन बाद झाला त्यावेळी भारताची स्थिती ४३.४ षटकांत ३ बाद २६१ अशी होती. सुरेश रैना ६ धावांवर बाद झाला. रहाणेही ७९ धावांवर असताना पायचीत झाला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १८ धावांवर झेलबाद, रविंद्र जडेजा २ धावांवर धावबाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ७ बाद ३०२ अशी झाली. मोहम्मद शमी आणि आर. अश्विनला आफ्रिकन गोलंदाजांनी फटकेबाजीसाठी संधीच दिली नाही व भारताला ५० षटकांत ३०७ धावाच करता आल्या. एबी डिव्हिलियर्सच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे रोहित शर्मा व रविंद्र जडेजा हे दोन फलंदाज धावबाद झाले. तर हाशिम आमलाने शिखर धवनला दिलेले जीवदान आफ्रिकेला चांगलेच महागात पडले. आफ्रिकतर्फे मॉर्ने मॉर्कलने दोन तर इम्रान ताहीर, वॅन पार्नेल व डेल स्टेनने प्रत्येकी एक विकेट घेतली. शेवटच्या षटकांत आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना रोखण्यात यश मिळवले.