कार्डिफ : वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या अॅशेज कसोटी सामन्यात विजयाकडे वाटचाल सुरू करताना आॅस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ७ बाद १६२ अशी दयनीय स्थिती केली आहे. आता आॅस्ट्रेलियाला विजयासाठी २५0 धावांची गरज असून त्यांचे फक्त दोनच फलंदाज बाद होण्याचे बाकी आहेत.उपाहाराला २ बाद ९७ अशी स्थिती असणाऱ्या आॅस्ट्रेलियाची फलंदाजीची फळी दुसऱ्या सत्रात ढेपाळली. त्यांनी या सत्रात अवघ्या ६५ धावांत पाच फलंदाज गमावले. उपाहाराआधी मोईन अलीने जम बसलेल्या डेव्हिड वॉर्नरला बाद केल्यानंतर आॅस्ट्रेलियाचे फलंदाज खेळपट्टीवर जास्तकाळ टिकाव धरू शकले नाहीत. उपाहाराला २९ धावांवर खेळणारा स्टीव्हन स्मिथला स्टुअर्ट ब्रॉडने दुसऱ्या सत्राच्या प्रारंभीच बाद करताना आॅस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. ब्रॉडने स्मिथला बेलकरवी झेलबाद केले. बाद होण्यापूर्वी ब्रॉडने ३३ धावा केल्या. त्यानंतर २१ धावांच्या अंतरातच कर्णधार मायकल क्लार्क (४), व्होजेस (१) आणि ब्रॅड हॅडिन (७) हे तीन मोहरे गमावल्याने आॅस्ट्रेलियन संघावर पराभवाचे संकट ओढावले. त्यातच शेवटच्या आशा असणाऱ्या शेन वॉटसनला वूडने पायचीत करीत इंग्लंडच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा जॉन्सन २६ आणि मिशेल स्टार्क ४ धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक २२ धावांत ३ बळी घेतले आहेत.अॅशेज कसोटीच्या चौथ्या डावातील सर्वांत मोठे लक्ष्य प्राप्त करण्याचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्यांनी १९४८ मध्ये हेडिंग्ले येथे तीन बाद ४0४ धावा करीत विजय मिळवला होता. आर्थर मॉरिसने या सामन्यात १८२ आणि महान फलंदाज डोनाल्ड ब्रॅडमनने नाबाद १७३ धावांची खेळी केली होती.आज सकाळी लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी १९ धावा धावफलकावर असताना सलामीवीर ख्रिस रॉजर्सला (१0) गमावले. स्टुअर्ट ब्रॉडने रॉजर्सला दुसऱ्या स्लीपमध्ये इयान बेलकरवी झेलबाद केले.त्याआधी रॉजर्स वैयक्तिक ४ धावांवर सुदैवी ठरला होता. तेव्हा अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याचा जो रुट याने झेल सोडला होता; परंतु तो या जीवदानाचा फायदा घेऊ शकला नाही. दुसरीकडे वॉर्नरने पहिल्या २३ चेंडूंत फक्त एक धाव केली होती; परंतु त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करताना पुढील ४९ धावा ४९ चेंडूत केल्या. इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुकने मोईनला गोलंदाजीसाठी बोलावले तेव्हा वॉर्नरने त्याचे स्वागत सलग चेंडूवर षटकार व चौकार मारत केले. तथापि, या फिरकी गोलंदाजाने वॉर्नरला पायचीत करीत हिशेब चुकता केला.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव ४३0, दुसरा डाव २८९.आॅस्ट्रेलिया : पहिला डाव ३0८. दुसरा डाव : ७ बाद १६२. (डेव्हिड वॉर्नर ५२. स्मिथ ३३, जॉन्सन खेळत आहे २६, वॉटसन १९. स्टुअर्ट ब्रॉड ३/२२, एम. अली २/३९, वूड २/३४).
इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर
By admin | Published: July 12, 2015 3:53 AM