मुंबई : अत्यंत चुरशीच्या झालेल्या प्रो कबड्डीचे तिसरे सत्र अंतिम टप्प्यात आले असून, आज, शुक्रवारी रंगणाऱ्या उपांत्य सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावेळी पहिल्या उपांत्य सामन्यात पटना पायरेट्ससमोर झुंजार पुणेरी पलटणचे कडवे आव्हान असेल, तर यानंतर गतविजेते आणि अव्वलस्थान मिळविलेले यू मुंबा लढवय्या बंगाल वॉरियर्सविरुद्ध दोन हात करेल.इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱ्या दोन्ही उपांत्य लढती रंगतदार होतील. यंदाच्या सत्रात संघामध्ये मोठे फेरबदल करून सर्वांनाच चकीत करताना पुणेरी पलटणने स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. कर्णधार मनजित चिल्लरचे आक्रमक नेतृत्व संघाच्या यशामध्ये निर्णायक ठरले असून, अजय ठाकूर, दीपक हुडा, जसमेर सिंग गुलिया या अनुभवी खेळाडूंची कामगिरीही महत्त्वपूर्ण ठरत आहे. यंदा तीन सामने बरोबरीत राखलेल्या पुणेकरांनी दोनवेळा बलाढ्य पटना पायरेट्सला बरोबरीत रोखले असल्याने पहिल्या उपांत्य लढतीत या दोन संघांतील थरार पुन्हा एकदा अनुभवता येईल. दुसरीकडे प्रदीप नरवाल, रोहित कुमार आणि संदीप नरवाल या बलाढ्य खेळाडूंचा समावेश असलेला पटना पायरेट्स तगडा संघ भासत आहे. त्यामुळेच अंतिम सामन्यासाठी प्रबळ दावेदार असलेला पटना संघ पुणेविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करेल.दुसऱ्या उपांत्य लढतीत बलाढ्य यू मुंबाचे बंगाल वॉरियर्सविरुद्ध पारडे किंचित वरचढ आहे. यंदाच्या अडखळत्या सुरुवातीनंतर मुंबईकरांनी आपला हिसका दाखवत सलग दहा विजयांची माळ गुंफून गुणतालिकेत थेट अव्वल स्थानी झेप घेतली. या संघामध्ये कर्णधार अनुप कुमार, रिशांक देवाडिया आणि राकेश कुमार या त्रिमूर्तीचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरत आहे. त्यामुळेच या तगड्या संघाविरुद्ध उपांत्य लढतीत दोन हात करणाऱ्या बंगाल वॉरियर्सपुढे अंतिम फेरी गाठण्यासाठी खडतर आव्हान असेल. (क्रीडा प्रतिनिधी)
दिल्लीत रंगणार उपांत्य लढतीचा रोमांचक थरार
By admin | Published: March 04, 2016 2:50 AM