- महेश चेमटे, मुंबई
ती आली... तिने पाहिले... ती खेळली... अन् अब्जोवधींच्या क्रिकेटवेड्या जनतेला खिळवून ठेवले! अशा काहीशा अंदाजात रिओ पदकवीर पी. व्ही. सिंधूच्या विजयाचे वर्णन करता येईल. सिंधूच्या अंतिम सामन्यात १-१ अशा बरोबरीनंतर निर्णायक सेटमध्ये ३१ मिनिटांच्या कालावधीत सुमारे ९७० हून जास्त टिष्ट्वट झाल्याने अवघी सोशल मीडिया ही सिंधूमय झाली होती.शुक्रवारचा दिवस गाजवला तो सिंधूनेच. नेटिजन्स मोठ्या आतुरतेने सिंधूच्या सामन्याची वाट पाहत असल्याचे त्यांच्याच ‘अपडेट’मुळे कळत होते. फेसबूक, व्हॉट्स अॅपवर टोमण्यांनी, शुभेच्छांच्या नोटिफिकेशनमध्ये सातत्याने वाढ होत होती. याही पुढे जात नेटिजन्स प्रवासातील आपल्या मित्रांना अपडेट देण्यासाठी ग्रुपमध्ये एका-एका गुणाची माहितीदेखील देत होते. टिष्ट्वटरसारख्या ठिकाणी तर मंत्री महोदयांपासून ते राजकीय पक्षाचे टिष्ट्वटर अकाउंट सांभाळणाऱ्यांमध्ये टिष्ट्वट करण्याची चक्क स्पर्धाच सुरू होती. टिष्ट्वटरवर टिष्ट्वट करणाऱ्यांची संख्या तशीही लक्षवेधीच असते. मात्र रिओ बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात सिंधूने खऱ्या अर्थाने कमाल केली. १-१ अशा बरोबरीनंतर निर्णायक सेट तब्बल ३१ मिनिटे रंगला. या ३१ मिनिटांत सुमारे ९७०हून जास्त टिष्ट्वट सिंधूच्या सामन्याचे होते. विशेष म्हणजे यात गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांचाच सक्रिय सहभाग होता. सामन्याच्या निकालानंतर टिष्ट्वटचा वेग मंदावला मात्र थांबला नाही. व्हॉट्स अॅपवर तर नेटिजन्सने आपल्या गु्रपचे ‘कम आॅन सिंधू’, ‘गर्व से कहो हम सिंधू है’असे नामकरण केले. ‘सिंधूफिव्हर’ दुसऱ्या दिवशीही कायम होता. चंदेरी सिंधूवर बक्षिसांची खैरात करणाऱ्या संदेशांनी टिष्ट्वटर गाजवले; शिवाय ‘करते रहे गुनाह हम, केवल बेटे के शौक में... कितने मेडल मार दिए, जीते जी ही कोख में...’ अशी शायरीही नेटिजन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून आले. अन् आर्चीला नाही म्हणा..!रिओ पदकविजेत्या साक्षी-सिंधूच्या आधी सोशल मीडियावर नेटिजन्स ‘सैराट’ झाले होते. मात्र या विजयानंतर नेटिजन्सनी आपली भूमिका बदलण्यास सुरुवात केली. ‘पळून जाऊन आई-बापाला मान खाली घालायला लावणाऱ्या आर्चीपेक्षा जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या साक्षी-सिंधू-दीपा यांची हवा करा... अन् आर्चीला नाही म्हणा..!’ असे फोटोसह संदेश व्हायरल होताना दिसले.