महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खूप मोठं नाव... झारखंड राज्यातील रांची येथील एक सामान्य कुटुंबातील 'माही' भारतीय क्रिकेटचा स्टार बनला... आयसीसीच्या तीन प्रमुख ( ट्वेंटी-२०वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ) स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव कॅप्टन कूलची संपती ७००-८०० कोटींच्या घरात आहे. पण, हे आज सांगण्याचं कारण की... त्रिनबागो येथे सुरू असलेल्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत धोनीच्या राज्यातील कन्येने रौप्यक्रांती केली आहे. त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पार पडली अन् त्यात भारताच्या आशाकिरण बार्लाने ८०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले.
आशाने जेव्हा भोपाळमध्ये पार पडलेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेत ८०० मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावले होते, तेव्हा तिला हा आनंद आपल्या आईला सांगायचा होता. पण, तिला दोन दिवस वाट पाहावी लागली. तिचा जिल्हा हा नक्षलग्रस्त आहे. तिच्या पदक जिंकल्याची बातमी आईला शेजाऱ्यांकडून समजली. त्यांच्याच फोनवरून आईने तिला कॉल केला. आशा बोकारो येथील आशू भाटीया यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेते.