ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 5 - भारताचा एकेकाळचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग सध्या सोशल मीडिया आणि समालोचनामधून क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करत आहे. वीरूची हटके आणि समोरच्याला बघताबघता घायाळ करणाऱी शेरेबाजी चर्चेचा विषय ठरतेय. दरम्यान, वीरूचा एकेकाळचा संघसहकारी रविचंद्रन अश्विनने आज सेहवागच्या स्वभावाबाबत बाबत एक मोठा खुलासा केला आहे.
वीरूला टीम मिटिंग अजिबात आवडायची नाही. तसेच मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे खेळणेही पसंत पडायचे नाही, असे अश्विनने सांगितले आहे. वॉट टू द डक 2 या कार्यक्रमाच्या चित्रिकरणादरम्यान अश्विनने सेहवागबाबत हा गौप्यस्फोट केला आहे. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतील आठवणींना उजाळा देताना अश्विन म्हणाला, "वीरू आणि टीम मिटिंग यांचे गणित कधीच जुळले नाही, टीम मिटिंगमध्ये भाग घ्यायला त्याला आवडायचे नाही. तसेच संघाने ठरवलेल्या रणनीतीनुसार खेळणेही त्याला आवडत नसे."
वीरूच्या या खोडीबाबत अजून एक गमतीदार बाब अश्विनने उघड केली. "एरवी टीम मिटिंगमध्ये भाग घेण्यास कंटाळणाऱ्या वीरूने एकदा प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याकडे मिटिंगमध्ये बोलण्याची इच्छा व्यक्त केली. सगळ्यांना वाटले. वीरू सामन्यातील रणनीतीबाबत बोलेल, पण वीरूने मिटिंगमध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या एक्स्ट्रा पासचा विषय काढला. तसेच पास न मिळाल्यास सामना न खेळण्याची धमकीही दिली,"असे अश्विन म्हणाला.