नवी दिल्ली : पैशाच्या मुद्यावर प्रशासकीय वादविवादामुळे अलीकडेच चर्चेत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) दहाव्या पर्वाला आज, बुधवारपासून प्रारंभ होत आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असलेल्या या रंगतदार टी-२० लीगमध्ये विराट कोहलीसह अनेक स्टार खेळाडूंची नक्कीच उणीव भासणार आहे. कोहलीसह अनेक भारतीय खेळाडू या पूर्ण स्पर्धेत किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खेळणार नसल्यामुळे स्पर्धेची रंगत काही अंशी कमी झाली आहे. सुरुवात होण्यापूर्वीच या लीगला काही आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देत अनेक राज्य संघांनी सामन्यांचे आयोजन करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) हे प्रकरण मिटवले. स्पर्धेदरम्यान अडचणी निर्माण होऊ नये यासाठी सीओएकडे आता अधिकाऱ्यांवर नजर राखण्याची महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. क्रिकेटबाबत चर्चा करताना कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूतर्फे खेळण्यासाठी केव्हा मैदानात उतरणार, याचे उत्तर पुढच्या आठवड्यात मिळेल. कारण तो सध्या खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. हैदराबादमध्ये आज, बुधवारी ज्यावेळी आरसीबी संघ विद्यमान चॅम्पियन सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध सलामी लढतीत खेळेल त्यावेळी भारतीय कर्णधाराची उणीव प्रकर्षाने जाणवेल. गेल्या मोसमात कोहलीने जवळजवळ एक हजार धावा फटकावल्या होत्या. त्यात चार शतकी खेळींचा समावेश होता. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वांधिक ४११० धावांची नोंद आहे. सुरुवातीच्या लढतींमध्ये उणीव भासणाऱ्या खेळाडूंमध्ये स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सचा समावेश आहे. तो सध्या पाठदुखीमुळे त्रस्त आहे. त्याचे पुनरागमन कधी होईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (वृत्तसंस्था) राइजिंग पुणे सुपरजायन्ट्स (आरपीएस) संघाला आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनची उणीव भासेल. सर्वांची नजर मात्र बेन स्टोक्सवर केंद्रित झालेली असेल. स्टोक्सला पुणे संघाने १४.५ कोटी रुपयांना करारबद्ध केले. ‘बिग बेन’ म्हणजेच स्टोक्सच्या प्रत्येक चेंडूची आणि त्याने फटकावलेल्या प्रत्येक धावेची तुलना त्याला मिळणाऱ्या रकमेसोबत करण्यात येईल. महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले असले तरी पुणे संघासाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू राहील. या व्यतिरिक्त पुन्हा एकदा चेन्नई संघासोबत जुळण्यापूर्वी धोनी दुसऱ्या संघासोबत आणखी एक ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी उत्सुक असेल. पुणे संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ व फॅफ डुप्लेसिस गेल्या वर्षी दुखापतग्रस्त झाले होते. त्याची उणीव ते यंदा भरून काढण्यास प्रयत्नशील आहेत. >दिल्ली डेअरडेव्हिल्सने संघाची निवड करताना विशेष हुशारी दाखविलेली नाही. या व्यतिरिक्त काही स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे आयपीएलमध्ये हा सर्वांत कमकुवत संघ भासत आहे. त्यांना क्विंटन डिकॉकची उणीव भासणार असून संघाचे मेंटर राहुल द्रविड यांनी तशी कबुली दिली. दिल्लीची भिस्त वेगवान गोलंदाज झहीर खान, मोहम्मद शमी, ख्रिस मॉरिस, पॅट कमिन्स आणि कॅगिसो रबादा यांच्यावर राहील. अमित मिश्रा ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो. पण फलंदाजीमध्ये करुण नायर व रिषभ पंत यांच्यावर मदार राहणार आहे.>किंग्स इलेव्हन पंजाब संघाला मुरली विजयची उणीव भासणार आहे, पण कर्णधार ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म संघासाठी सुखावणारी बाब आहे. वीरेंद्र सेहवाग संघाचा मेंटर असून त्याला मनन व्होरा, मार्क्स स्टोनिस व रिद्धिमान साहा यांच्याकडून फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरीची आशा आहे.>विद्यमान चॅम्पियन सनरायजर्स संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नर करणार आहे. त्यांचा संघ जवळजवळ पूर्वीप्रमाणेच आहे. त्यात युवराज सिंग, दीपक हुड्डा आणि शिखर धवन यांचा समावेश आहे. पूर्णपणे तंदुरुस्त असल्यानंतर आशीष नेहरा व मुस्तफिजुर रहमान छाप सोडण्यास सक्षम आहेत.>रोहितचा फॉर्म महत्त्वाचा...मुंबई इंडियन्सबाबत चर्चा करताना कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म केवळ त्याच्या फ्रॅन्चायझीसाठीच नाहीतर भारतीय संघासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. कारण भारतीय संघ यानंतर इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद राखण्यासाठी उत्सुक आहे. जोस बटलरची फलंदाजी व हरभजनसिंगचा अनुभव संघासाठी महत्त्वाची बाब आहे.>गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनासाठी हे महत्त्वाचे सत्र आहे. कारण त्याला वन-डे टीम आणि केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे. संघाबाबत चर्चा करताना रवींद्र जडेजा संघात सहभागी होत नाही तोपर्यंत ड्वेन ब्राव्होला अष्टपैलूची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. >कोलकाता नाईट रायडर्सची भिस्त बऱ्याच अंशी गौतम गंभीर, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे या चार फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. युसूफ पठाण आपली उपयुक्तता सिद्ध करण्यास प्रयत्नशील राहील. आंद्रे रसेलवर एक वर्षाची बंदी घालण्यात आल्यामुळे केकेआर संघाचे संतुलन ढासळले आहे, पण उमेश यादव संघात परतण्यापूर्वी वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांवर ख्रिस व्होक्स व ट्रेंट बोल्ट यांचा वापर करण्यात येण्याची शक्यता आहे.
आयपीएलची रंगत आजपासून
By admin | Published: April 05, 2017 12:06 AM