इपोह : आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरीत अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला आज मंगळवारी २५ व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पाकिस्तानवर विजय मिळविणे आवश्यक राहील. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकवर विजय नोंदविण्यासाठी भारतीय खेळाडूंना कामगिरी सुधारण्याचे आव्हान असेल. पाच वेळेचा विजेता भारताने मागच्या वर्षी कांस्यपदक जिंकले होते. सरदारासिंग याच्या नेतृत्वाखालील संघात अनेक युवा चेहरे आहेत. पण, कॅनडासारख्या संघावर विजय नोंदविण्यासाठी भारतीय खेळाडूंना घाम गाळावा लागला होता. कॅनडावर ३-१ ने विजय मिळाल्याने तीन सामन्यांत सहा गुणांच्या बळावर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. पाकचे तीन सामन्यांतून केवळ तीन गुण झाले. पाकने एकमेव विजय मिळविला तो कॅनडावर. मागचा विजेता आॅस्ट्रेलियाचे तीन सामन्यांतून नऊ गुण आहेत, तर सध्याचा चॅम्पियन न्यूझीलंडचे चार सामन्यांनंतर आठ गुण आहेत. भारत-पाक हॉकी सामना उभय देशांतील हॉकी चाहत्यांसाठी प्रतिष्ठेचा आणि कुतुहलाचा ठरतो. या संघांमधील सामना स्पर्धेचीही ओळख असतो. स्पर्धेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात होणाऱ्या भारत-पाक सामन्याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. भारताने द. आशियाई स्पर्धेत हॉकीचा मुख्य संघ उतरविला नव्हता. ज्येष्ठ खेळाडू त्या वेळी हॉकी इंडिया लीगमध्ये व्यस्त होते. उभय देशात शेवटची लढत एंटवर्प येथे मागच्या वर्षी झाली. हॉकी विश्व लीगच्या सेमीफायनलची ही लढत २-२ ने बरोबरीत सुटली होती. (वृत्तसंस्था)भारतात या सामन्याची प्रतीक्षा आहे. मी खेळाडूंना अन्य सामन्यांसारखाच हा सामना जिंकायचा आहे, असा मंत्र दिला. खेळावर लक्ष द्या आणि गोल नोंदवा, असे बजावले आहे.- रोलैट ओल्टमन्स, कोच भारत.
हॉकीमध्ये हाय व्होल्टेज लढत आज
By admin | Published: April 12, 2016 3:45 AM